उरण ः प्रतिनिधी
जेएनपीटी बंदरात आतापर्यंत हाताळण्यात आलेल्या जहाजांपेक्षा सर्वात जास्त खोली असलेले एमएससी सिंडी (15.6 मीटर) मालवाहतूक जहाज एनएसआयजीटी टर्मिनलमध्ये दाखल झाले आहे. जागतिक स्तरावर टॉप 30 कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटी एकमात्र भारतीय बंदर आहे. आजच्या काळात भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर बंदर म्हणूनही त्याचे स्थान मजबूत करून जगातील 28वे कंटेनर बंदरदेखील बनले आहे.
समुद्री व्यवसायाशी संबंधित इतर बंदर निर्मित व्यापारामध्ये कोणत्याही बंदराची गुणवत्ता परिभाषित करणारे दोन महत्त्वपूर्ण घटक म्हणजे त्यांच्या व्यवसायाची कार्यक्षमता आणि हाताळणी क्षमता असते. जेएनपीटीने तीन दशकांमध्ये या महत्त्वपूर्ण घटकांना सुधारित करण्यासाठी पद्धतशीरपणे गुंतवणूक केली आहे.
बंदर क्षमतेच्या विस्तारावर जेएनपीटीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच नेव्हिगेशनल चॅनेलचे ड्रेजिंग हे सर्वात महत्त्वाचे आणि अलीकडचे आहे. नेव्हिगेशन चॅनेलचे ड्रेजिंग 14 मीटरहून 15 मीटर करण्यात आले असून, त्यामुळे 12,500हून जास्त कंटेनर मालवाहतूक करणारी जहाजे जेएनपीटी बंदरात येऊ शकणार आहेत. चॅनेलची खोली वाढविण्याबरोबरच ड्रेजिंग प्रकल्पात 370 मीटर ते 450 मीटर रुंदी वाढवण्यात आली असून, चॅनेलची लांबी दोन किलोमीटरने वाढवून आता 35.5 किमी इतकी झाली आहे. जागतिक बाजाराचा ट्रेंड लक्षात घेता मोठी मालवाहू जहाजे एकाच वेळी अधिक माल घेऊन यावीत यासाठी धोरणात्मक विकास करून जेएनपीटी आता नवीन पिढीच्या जहाज हाताळणीसाठी अधिक चांगल्या प्रकारे सज्ज झाले आहे.
-या रणनीतिक विकासावर आयात-निर्यात समुदायाला व्यापारात वेळ व पैसे याची बचत करणे हे आमचे मुख्य लक्ष्य असून, नेव्हीगेशनल चॅनेलचे ड्रेजिंग हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
-संजय सेठी जेएनपीटी अध्यक्ष