चीनमधील कोरोना उद्रेकाच्या बातम्या गेला महिना-दीड महिना येतच होत्या. पण ताजी परिस्थिती जगभराला पुन्हा धडकी भरवणारी आहे. चीनमधील कोविडच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत भीषण वेगाने वाढल्यामुळे तेथील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. याच काळात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल या देशांमध्येही कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून आल्यामुळे आपल्या केंद्र सरकारने शिताफीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याची नितांत गरज मात्र आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी 2019च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांच्या दरम्यानच चीनमध्ये कोरोनाचा विषाणू पसरू लागला आणि मग 2020च्या मार्च महिन्यापर्यंत त्याचा जगभरात पुरता फैलाव झाला. भारतातही मार्च अखेरीस कोविडचे रुग्ण सापडू लागले आणि केंद्र सरकारने झपाट्याने उपाययोजना करत लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाच्या फैलावाच्या एकाहून अधिक लाटांचे सत्र मग अगदी गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत सुरू होते. 2022 मात्र अद्यापपर्यंत तरी बर्यापैकी कोरोना भीतीमुक्त वातावरणात पार पडले. पण चालू वर्षाचा अखेरचा आठवडा-दीड आठवडा तसाच जाईल असे मात्र आता खात्रीने म्हणता येणार नाही. चीन, जपान पाठोपाठ अमेरिका आणि ब्राझिलमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जगभरात आताच्या घडीला आठवड्याला 35 लाख कोविड रुग्णांची भर पडत असताना भारतात परिस्थिती तुलनेने बरी आहे. आपल्याकडे सध्या आठवड्याला अवघे 1200 रुग्ण आढळत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. अफाट लोकसंख्या असूनही भारतात कोविडप्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवण्यात सरकारला यश आले. आताही केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आदेश मंगळवारीच देशभरातील सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूंमधील बदलांची तपशीलवार माहिती या जनुकीय क्रमनिर्धारणातून मिळू शकेल. नव्या कोरोना विषाणूचा प्रकार, त्याची संसर्ग क्षमता आदी अतिशय महत्त्वाची माहिती यातून हाती येईल. या माहितीच्या आधारे सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सरकारला आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करता येणार आहेत. दरम्यान, चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त वर्तनाचे पालन या पंचसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. बुधवारीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर कोविड अद्याप संपलेला नाही. सर्व संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले. राष्ट्रीय पातळीवरील कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जनतेला पुन्हा मास्क वापरण्याची सूचना केली असून तूर्तास मास्कसक्ती मात्र करण्यात आलेली नाही. येत्या तीन-चार दिवसांत नाताळचा सण असून नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुटीच्या काळात नागरिक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्याची शक्यता ध्यानात घेऊन लवकरच त्यासंदर्भातील तपशीलवार सूचना जारी केल्या जातील. वास्तवत: याच प्रवासातून देशात पुन्हा कोरोनाच्या घातक विषाणूचा शिरकाव होण्याची शक्यता दिसते आहे. जगभरातील सर्वच देशांना या शक्यतेची भीती वाटत असून चीनमधील उद्रेकामधून पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची टांगती तलवारही आहेच. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण याबद्दल पारदर्शकपणे माहिती मिळत नसल्यामुळे अवघे जगच चिंतेत सापडले आहे. तूर्तास खबरदारीच्या उपाययोजनेखेरीज या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा अन्य काही उपाय नाही हेच खरे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …