मुरूड शहरात घबराटीचे वातावरण
मुरूड : प्रतिनिधी
शाळेत चाललेल्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळी तृतीयपंथींनी केला. मात्र या मुलांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो विफल ठरला असला तरी या घटनेने मुरूडमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. एकदरा गावातील पाचवीत शिकणारे प्रियल सुरेश मकु (वय 10) व साईराज नितेश देवळाटकर (वय 10) हे दोन विद्यार्थी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मुरुडमधील सर एस. ए. हायसकूलमध्ये चालले होते. त्यावेळी एका पांढर्या रंगाच्या मारुती व्हॅनमधून साडी परिधान केलेले तृतीयपंथी लोकांनी या मुलांच्या तोंडावर हात ठेवून त्यांना तातडीने व्हॅनमध्ये टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाडी कोटेश्वरी मंदिरपर्यंत आली असताना एका मुलाने एका तृतीयपंथाच्या हाताला चावा घेतला व वाचवा वाचावा अशी आरोळी ठोकली. याचवेळी मॉर्निंग वॉक करणारी काही मंडळी गाडी समोरून येत होती. त्यांना पाहून अपहरणकर्त्यांनी तातडीने दरवाजा उघडून या दोन्ही मुलांना गाडी बाहेर ढकलून दिले. आणि गाडीतून अलिबागच्या दिशेने पोबारा केला. दोन्ही मुलांनी घरी जाऊन सर्व प्रकार पालकांना सांगितला. अनेक पालकांनी हायस्कूलमध्ये जाऊन या घटनेबाबत चौकशी केली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राणे यांनी मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. या वेळी पोलिसांनी काही भागात गस्त घालावी, अशी मागणी पालकांनी केली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तीकडून कोणत्याही वाहनांची मदत घेऊ नये, तसेच चॉकलेट अथवा अन्य वस्तू घेणे टाळावे, असे आवाहन मुरुडच्या गटशिक्षण अधिकारी मेघना धायगुडे यांनी केले आहे. तर संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहून त्याची माहिती पोलिसांना (02144274033) द्यावी, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.