पनवेल : वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असून अनेक वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे घरफोड्या व चोर्या होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशनचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित सुप्रसिद्ध अशा ओरायन मॉल येथे मालमत्ता चोरी प्रतिबंधक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची माहिती व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग विठ्ठल दामगुडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभागाचे रवींद्र गिड्डे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विनोद चव्हाण, ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, आरमोर इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशन प्रा. लि.चे विजयकुमार शर्मा, ओरायन मॉलचे मनन परूळेकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग, पोलीस मित्र, महिला दक्षता समिती, व्यापारी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले की, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विनोद चव्हाण यांनी सुत्य उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल. लोकांनी आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चोर्या मोठ्या प्रमाणात कमी होतील व आपल्या मालमत्तेचे रक्षण होईल, असे त्यांनी सांगितले, तर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेशाखा अजय कदम यांनी सांगितले की, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी ही नवीन यंत्रणा फायद्याची आहे. लोकांनी याची माहिती घ्यावी व वेळोवेळी पोलीस घरफोडी, तसेच वाहन चोरी टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना करीत असतात, त्या समजून घेऊन त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले, तर सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग विठ्ठल दामगुडे यांनी सांगितले की, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास गुन्हे टाळले जाऊ शकतात. वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांपासून कसे सुरक्षित राहावे यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तरी सर्व नागरिकांनी याची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे
आभार वपोनि विनोद चव्हाण यांनी मानले.