पोलादपूर : प्रतिनिधी
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (दि. 6) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आमदार कदम बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार कदम यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार योगेश कदम हे मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ कशेडी घाटात रात्री सव्वादहाच्या सुमारास एका भरधाव डम्परने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आमदार योगेश कदम यांनी हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आई जगदंबेच्या कृपेने या अपघातातून मी सुखरूप बचावलो. माझ्या गाडीच्या पाठीमागे माझी एस्कॉर्ट गाडी होती आणि पुढे रायगड पोलिसांची गाडी होती. तरीही मागून एक डम्पर वेगाने आला आणि पोलिसांच्या गाडीला धडकला. त्यानंतर माझ्या गाडीलासुद्धा जोरदार धडक बसली. मी सीटबेल्ट घातला होता. त्यामुळे मला काहीही दुखापत झाली नाही, पण या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. त्यामुळे यामध्ये घातपाताची शक्यता आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितले आहे तसेच या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली आहे. आम्हाला जी शंका आली आहे, त्या दृष्टीने तपास करून सत्य जर पुढे आले, तर चांगलेच आहे. भविष्यात त्या दृष्टीने काळजी घेता येईल.
Check Also
पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडकोने तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या …