मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या ऊरात धडकी भरविणारी युद्धनौका आयएनएस विक्रांतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संस्कार भारती (कोकण प्रांत), ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वांत मोठी युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन मुंबई येथे 12 ते 20 जानेवारीदरम्यान भरविण्यात येत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी पंचरत्न हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परूळेकर, संस्कार भारतीचे अॅड. अमित चव्हाण, कोकण प्रांत उपाध्यक्ष सुनिता खरे, रायगड विभाग प्रमुख सुलक्षणा टिळक, ओरायन मॉलचे संचालक मनन परूळेकर उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पनवेलच्या नावलौकिकात भर घालणार्या गोष्टींबद्दल आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्याचप्रमाणे एक अभिमानाची बाब म्हणून आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती दृष्टिक्षेपात आली आहे. कोविडच्या दुःखद काळानंतर विविध सण साजरे करायला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वांत मोठा सण दिवाळी साजरा होत असताना संस्कार भारती व ओरायन मॉलच्या वतीने आयएनएस विक्रांत प्रतिकृती लोकांच्या हृदयात सामवण्यासाठी प्रदर्शनाच्या रूपात मांडण्यात आली. त्याला पनवेलकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून लोकं येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते. त्या अनुषंगाने ही माहिती फक्त पनवेलपुरती मर्यादित न ठेवता त्याची महाराष्ट्रभर माहिती व्हावी याकरिता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यानिमित्ताने पनवेलमध्ये जन्म झालेली आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्रभर पोहचणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
संस्कार भारतीचे महामंत्री अॅड. अमित चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती विचार रूजविण्याच्या दृष्टिकोनातून संस्कार भारती काम करीत असते. आयएनएस विक्रांत हे आताचे जहाज भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढविणारे आहे. देशाची पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल झाली आहे. याची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि पुढाकार लाभला तसेच ओरायन मॉलचे मालक मंगेश परूळेकर यांचे पाठबळ लाभले. त्या अनुषंगाने पहिले प्रदर्शन ओरायन मॉलमध्ये यशस्वी झाले. या जहाजाची प्रतिकृती संस्कार भारतीच्या चित्रविद्या विभागाचे प्रमुख सिद्धार्थ साठे यांनी अवघ्या 12 दिवसांत भव्य स्वरूपात आणि बारकाईने सर्व बाबी समाविष्ट करून साकारली असून या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळेल.
भारताच्या ऐतिहासिक युद्धात आयएनएस विक्रांत युद्धनौकेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पनवेलनंतर मंत्रालयात तिची प्रतिकृती प्रदर्शन रूपाने मांडण्यात येणार आहे. 20 जानेवारीपर्यंत ती तेथे ठेवण्यात येईल. त्यानंतर शक्य झाल्यास इतर जिल्ह्यात नेण्यात येईल मग पनवेलच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
गतवर्षी दिपावलीमध्ये आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती ओरायन मॉलमध्ये प्रदर्शन रूपात दाखल झाली होती. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले आणि उदंड प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला होता. त्या अनुषंगाने मंत्रालयात होणार्या प्रदर्शनाने महाराष्ट्रात प्रतिकृतीची प्रसिद्धी होईल.
-मंगेश परूळेकर, ओरायन मॉल