नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानबरोबर चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो, असे मत मांडले. त्यामुळे त्यांच्यावर चौफर टीका सुरू असून त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी त्यांना प्रखर विरोध केला. त्यामुळे सिद्धू यांचा पारा चढला व अकाली दल आमदार बिक्रम सिंग मजिठियांबरोबर त्यांची शाब्दिक वादावादीही झाली. सिद्धू यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी अकाली दलाच्या आमदारांची मागणी आहे. सिद्धू यांची ‘कपिल शर्मा शो’मधूनही हाकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मजिठिया यांच्या नेतृत्वाखाली अकाली नेत्यांनी नवज्योत सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीचे फोटो जाळून आपला निषेध व्यक्त केला. विधानसभेत मजिठिया व अन्य आमदारांनी सिद्धू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातावर काळी फीत बांधून आलेले हे आमदार सिद्धू बोलत असतानाही घोषणाबाजी करीत होते. मागच्या वर्षी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले होते. या संपूर्ण वादावर आम्हाला काँग्रेस व पंजाब सरकारची स्पष्ट भूमिका समजली पाहिजे. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध करणार का, असा सवाल मजिठिया यांनी केला. सभागृहात एकमताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा ठरावही मंजूर करण्यात आला.