Monday , January 30 2023
Breaking News

प्रजासत्ताकाचे सिंहावलोकन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनासमितीने तयार केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आणि तितकीच संपन्न अशी संस्कृती पाठिशी असलेला आपला देश हे एक प्रजासत्ताक आहे याची आठवण अधोरेखित करणारा हा दिवस आपल्यापैकी प्रत्येकाने मनोभावे साजरा करावा असाच.

आपल्याकडे काय आहे याचे मोल समजून घेण्यासाठी कधी कधी अवतीभवतीच्या अभावावर नजर फिरवावी लागते. भारताच्या शेजारील राष्ट्रांवर नजर टाकली असता आपला देश, आपले प्रजासत्ताक किती भरभक्कमपणे आपली लोकशाही व्यवस्था टिकवून आहे हे ढळढळीतपणे दिसून येते आणि आपला आपल्या भारतीयत्वाविषयीचा अभिमान किती सार्थ आहे याचीही जाणीव होते. साधारण आपल्याच सोबत स्वातंत्र्यप्राप्ती झालेल्या शेजारील देशांमध्ये आज लष्करशाही वा एकाधिकारशाही स्पष्टपणे दिसून येते. याउलट भारताने विकासाच्या वाटेवर गेल्या सात दशकांमध्ये बरीच मजल मारली असून 2014 पासून तर आपण जागतिक स्तरावरही अतिशय आत्मविश्वासाने पाय रोवून उभे राहिल्याचे दिसून येते. याचे श्रेय अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर आणि सुस्पष्ट विचारांच्या नेतृत्वालाच जाते. 73 वर्षांपूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताने आपल्या राज्य घटनेचा अर्थात संविधानाचा स्वीकार केला. त्याआधी आपल्याकडे स्वत:चे असे संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील घटना समितीने अतिशय अथक परिश्रमातून पुढची असंख्य वर्षे देशाचा गाडा सुविहितपणे हाकण्यास साह्यभूत ठरेल असे संविधान तयार केले. देशाचा कारभार करण्याचा अधिकार या संविधानाने देशातील नागरिकांना बहाल केला. त्यामुळेच त्या अधिकाराची जाणीव जागी करणारा हा दिवस आपण सार्‍यांनीच मनोभावे साजरा केला पाहिजे. गेल्या 73 वर्षांमध्ये आपल्या देशात अनेक उलथापालथी घडल्या. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेला देश. लोकांनी लोकांसाठीच चालवलेले लोककल्याणकारी लोकराज्य अशी साधीसोपी प्रजासत्ताकाची व्याख्या थोर मानवतावादी नेते व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली होती. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय प्रजासत्ताकाचे वर्णन ‘वी द पिपल’ या तीन शब्दांमध्ये अचूकपणे केले होते. प्रजासत्ताकाच्या मूलतत्वाला नख लावण्याचा प्रकार आणीबाणीच्या काळात झाला खरा, परंतु तो अपवाद वगळता भारतातील लोकराज्य यथार्थपणे चालू राहिले. भारताला स्वातंत्र्य देण्याआधी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बरीच खळखळ केली होती. भारतातील अडाणीपणा, अंधश्रद्धा, रोगराईग्रस्त जनता यामुळे स्वतंत्र कारभार अथवा प्रजासत्ताक भारतीयांना परवडणार नाही असा युक्तिवाद ब्रिटिशांतर्फे केला जात असे. प्रजासत्ताकाच्या 73व्या वाढदिवशी सिंहावलोकन करताना ऊर अभिमानाने भरून येतो कारण ब्रिटिशांनी केलेले भाकित भारतीयांनी फोल ठरवले. आपल्या प्रजासत्ताकाची वाटचाल समर्थपणे सुरू राहिली आहे. भारतीय प्रजासत्ताक आज 74 वर्षांचे झाले. मानवी वयोमानानुसार हा वार्धक्याचा टप्पा मानला जातो, परंतु प्रजासत्ताकाचे सर्वसमावेशक आणि चिरकालिक रूप पाहता पाऊणशे वयोमान काही फार मानता येणार नाही. किंबहुना, आता कुठे भारतीय प्रजासत्ताकाला सूर सापडला आहे म्हणूनच सात दशकांहून अधिक काळच्या वाटचालीनंतर समर्थ भारताचा लौकिक सातासमुद्रापार पसरू लागला आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात भारताचे मत जाणून घेतल्याखेरीज जगाला पुढे जाता येत नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय प्रजासत्ताक सूर्यासारखे तळपते आहे. ते असेच हजारो वर्षे तळपत राहो हीच प्रार्थना.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply