पोलादपूर तालुक्यात शेती वगळता दुसर्या कोणत्याही व्यवसायाची पाळंमुळं रूजली नसल्याने गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक मालमत्तेची चोरी तसेच भंगारासोबत इंधन रसायनाच्या चोरीचेही धंदे फोफावू लागले आहेत. पोलादपूर शहरातील भैरवनाथनगरमधील पाणीपुरवठयाची सिंन्टेक्स्टची साठवण टाकी तुकडे तुकडे करून भंगारामध्ये विकल्याच्या घटनेवरून राजकारण तापल्यानंतर अशाप्रकारच्या अनेक साठवण टाक्यांचे तुकडे ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनांची वासलात लावून नवीन योजनांचा मार्ग खुला करण्यासाठी कार्यकर्त्यांनीच भंगारमध्ये विकल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. यानंतर या घटनांकडे राजकीय घटना समजून विरोधकांनीही दूर्लक्ष करण्यास सुरूवात केली, मात्र आता वेगवेगळया प्रकारचे भंगार चोरताना चक्क सार्वजनिक मालमत्तेची हानी करून भंगारात रूपांतर करण्यासोबत चोरी व विक्री करण्याची भुमिका उघड झाली. तालुक्यातील चिरेखिंड गावातील ट्रान्सफॉर्मरमधील तांबे धातूची तब्बल 75 हजार रूपये किंमतीची कॉईल चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस तपासात हा मुद्देमाल किंमती असल्याची चर्चा सुरू झाली. आता हा नवीन सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचा विषय झपाट्याने तालुक्यात सरावाने फोफावण्याआधीच यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. मध्यंतरी, पोलादपूर शहरामध्ये जुने काँक्रीटरस्ते खणून त्यामधील स्टील काढण्यासाठी तातडीने संपूर्ण मलबा चोरीला गेल्याची माहिती प्राप्त होऊनही याबाबत चर्चा झाली नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विविध अवैध धंद्यांना ऊत येत असताना होणार्या अर्थपूर्ण दूर्लक्षात सध्या मोठया प्रमाणात भर पडली असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी लोहारमाळ येथे रस्त्यालगत पडलेला वीजेचा जुना लोखंडी खांब ट्रकमधून बाहेर दिसणार नाही एवढाच कापून ठेवताना एक व्यक्ती दिसून आल्याचा एक व्हिडीओ महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सूद यांना एका ग्रामस्थाने मोबाईलद्वारे पाठविल्यानंतर यासंदर्भात केवळ संबंधित कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला तंबी देणारे पत्र पोलादपूर उपविभागाकडून पाठविण्यात आले असले तरी हा प्रकार महाड-पोलादपूर दरम्यान सातत्याने सुरू असलेल्या जुने-नवे स्टील चोरीच्या घटनांपैकी असल्याची चर्चा सुरू आहे. पोलादपूर तालुक्यात तुर्भे सबस्टेशनजवळ महावितरणचे ज्ञानेश्वर माने हे फिर्यादी त्यादिवशीच सायंकाळी साडेचार वाजता आले असता त्यांना एलटीलाईनचा पोल अज्ञात व्यक्ती कापून नुकसान करून ठेवलेला दिसले. याबाबत त्यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदविली असता अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा भा.दं.संहिता 1860च्या धारा 2 च्या 427 नुसार नोंदविण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार मगर अधिक तपास करीत आहेत. तालुक्यातील रस्त्यालगतचे क्रॅश बॅरियर्स तसेच अन्य लोखंडीसामान गायब होण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या रस्त्यालगतचे खांब काढून बाजूला ठेवून नवीन रस्त्यालगत विजेचे पर्यायी खांब उभारण्यात आले असताना त्या खांबांची वेळीच दिवील रस्त्यावरील तुर्भे सबस्टेशनच्या आवारात वाहतूक न झाल्याने चोरीला जाण्याचा प्रकार वाढला आहे. समुद्रातून लोटाभर पाणी कमी झाल्याने काही फरक पडत नाही या न्यायाने गेल्या काही महिन्यांपासून ट्रक्स, कंन्टेनर्समधून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक होणार्या स्टीलमधून काही स्टील परस्पर संगनमताने काढून बाजूला साठविणे, रस्त्यालगतचे जुने विजेचे खांब काही अंतरावर ठेऊन कालांतराने ते ट्रकबाहेर दिसणार नाहीत इतपत लांबीने कापून त्यांची वाहतूक करणे, दरीलगतचे क्रॅश बॅरियर्स दरीत ढकलून कालांतराने त्याची परस्पर वाहतूक करून विक्री करणे अथवा त्याच क्रॅश बॅरियर्सना चंदेरी रंग लावून ठेकेदाराला नवीन क्रॅश बॅरियर म्हणून विकणे आदी कामांमध्ये स्टील गायब करण्यामध्ये सक्रीय असलेल्या व्यावसायिकांना संबधित खात्यातील लोकांचेही छुपे सहकार्य मिळत आहे. लोहारे येथील विजेचा जुना लोखंडी खांब कापण्यामागील आरोपी उपकार्यकारी अभियंत्यांच्या पत्रात एस.टी.इलेक्ट्रीकल्स प्रा.लि.चा कामगार असल्याचे नमूद करून पुन्हा असे घडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला असताना काही तासांतच महावितरणचे ज्ञानेश्वर माने यांनी नोंदविलेल्या एनसीमध्ये संबंधित कामगाराचा अज्ञात असा उल्लेख केलेला दिसून येत असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील सैनिकनगर येथे सध्या वास्तव्यास असलेल्या प्रदीप तुकाराम चव्हाण (वय 36, जळगांवरोड, ता.जि.औरंगाबाद) यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून बांधकामाच्या साहित्याची सातत्याने चोरी होत असल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्याला दिली होती. यामध्ये 25 मी.मी. जाडीचे बांधकामाच्या जुन्या वापरत्या स्टीलचे तुकडे अंदाजे 250 कि.ग्रॅ. वजनाचे किंमत अंदाजे 15 हजार रूपये आणि 32 मी.मी. जाडीचे जुन्या वापरत्या स्टीलचे अंदाजे 350 कि.ग्रॅ. वजनाचे तुकडे यामुळे हे बांधकाम साहित्य हस्तगत करण्याचे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर होते. या वेळी गुप्तवार्ता विभागाने या बांधकाम साहित्याच्या चोरीवर बारकाईने लक्ष ठेवले असता भुयारी महामार्गाचे काम सुरू असलेल्या भोगाव गावाच्या हद्दीत 4 मार्च रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून 5 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एका गोठ्यामध्ये अंदाजे 36 हजार रूपये किंमतीचे हा बांधकाम साहित्यातील जुने वापरते स्टिल हस्तगत केले. या वेळी आरोपीचे नांव गांव अज्ञात असून याप्रकरणी पोलीस हवालदार चव्हाण हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. पोलादपूर शहरातील पार्टेकोंड ते सावंतकोंड दरम्यानचा एक लोखंडी पूल चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची तक्रार नगरपंचायत पोलादपूरकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी याच पुलाच्या ठिकाणी या पुलाचे अवशेष आणून टाकले आहेत. रविवारी ही बातमी पोलादपूर शहरात सर्वत्र पसरल्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई होण्याऐवजी त्याचा बचाव करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, याठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीने पार्टेकोंड-सावंतकोंड भागातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पायी तसेच दुचाकीवरून शहराशी संपर्कात राहण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत साधारणपणे 50-60 फूट लांबीचा आणि सहा फूट रूंदीचा एक लोखंडी पूल बांधून घेतला होता. यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर या पार्टेकोंड सावंतकोंड भागात रस्ता करण्यात आल्याने या लोखंडी पुलावरील रहदारी बंद झाली. गेल्या काही वर्षांपासून वापराविना असलेल्या या लोखंडी पुलाकडे रस्त्यावरून जाणार्या व येणार्या स्थानिक लोकांचे लक्ष असे. सोमवारी सायंकाळी पोलादपूर नगरपंचायतीचा लोकप्रतिनिधी याठिकाणी येऊन पाहणी करून गेला आणि रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक ओळखीचे वाहन येऊन गेले. दुसर्या दिवशी मंगळवारी हा लोखंडी पूल नटबोल्ट कापून चोरीला गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. पोलादपूर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी महादेव सरंबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यासंदर्भात पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करून याप्रकरणी पोलीस हवालदार वाय. व्ही. चव्हाण यांनी तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 7 एप्रिल 2022 रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरपंचायतीच्या ताब्यातील सावंतकोंड, पार्टेकोंड प्रभाग क्र.1मध्ये नळपाणीपुरवठा करण्याची पाईपलाईन चोरीला गेल्याची तक्रार मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे दिली आहे. प्रभाग क्र.1 मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक लोखंडी पुल कापून चोरून नेण्याची घटना गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आली होती.
-शैलेश पालकर