Breaking News

उकाडा वाढल्याने वीजवापरही वाढला

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महावितरणच्या पनवेल विभागात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत तब्बल 48 लाख युनिटची वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर गारवा संपताच, वाढलेल्या उकाड्यामुळे हा वीज वापर वाढल्याचा अंदाज आहे. पनवेल विभागात उरण, पनवेल शहर, खारघर, कळंबोली आणि भिंगारी उपविभागात एकूण चार लाख 50 हजार वीजग्राहक आहेत. सुमारे 900 कारखाने असलेली मोठी एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, जेएनपीटी आदी मोठा वीजवापर असलेल्या भागात घरगुती वीजवापरदेखील अधिक आहे. यंदा हिवाळा लांबल्यामुळे विजेची मागणी फेब्रुवारीपर्यंत फार नव्हती. मात्र मार्चमध्ये उन्हाचा तडाखा सुरू झाल्यानंतर एसीचा वापर वाढल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली. पनवेल विभागात फेब्रुवारीत विजेचा एकूण वापर 175.89 लाख युनिट होता, मार्चमध्ये यात 27.32 टक्क्यांची भर पडून 223.96 लाख युनिट वीज वापरली गेली. उन्हाळ्याच्या दिवसांत घरे तसेच दुकानांमध्ये एसीचा वापर प्रचंड वाढल्यामुळेच वीज वापर वाढत असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विजेवरील भार वाढून वीज खंडित होण्याच्या घटना याच कालावाधीत वाढतात. त्यामुळे वीज ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचा प्रयत्न करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे यांनी केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply