महापालिका रुग्णालयात एनआयसीयू बेड्समध्ये वाढ
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये कार्यरत असून बेलापूर येथे माता बाल रूग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्डची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेड्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक रूग्णालय वाशी येथील 9 एनआयसीयू बेड्समध्ये भर घालत 24 बेड्स. माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथील 9 एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 24 बेड्स, राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथील 10 एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 22 बेड्स तसेच माता बाल रूग्णालय बेलापूर येथील चार एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 12 बेड्स अशाप्रकारे आधीच्या एकूण 32 एनआयसीयू बेड्समध्ये 50 बेड्सची भरीव वाढ करीत सद्यस्थितीत 82 एनआयसीयू बेड्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्डमधील बेड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जास्तीत जास्त नवजात शिशूंवर उपचार करणे शक्य होत आहे. नवजात अतिदक्षता विभागात वार्मरचा उपयोग हा प्रसुती कक्षात सुरूवातीच्या काळात नवीन जन्मलेल्या अर्भकाची काळजी घेण्यासाठी तसेच 28 दिवसांवरील कमी वजनाच्या बालकांसाठीसुध्दा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फोटेथेरपी मशीन्सचा कावीळची लक्षणे असलेल्या नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी उपयोग होत आहे. नमुंमपाच्या सार्वजनिक रूग्णालयामध्ये मागील 4 महिन्यात 276 नवजात शिशूंवर उपचार करण्यात आले आहेत. यातील एक कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या तीन आणि 1 ते 1.2 कि.ग्रॅ. वजनाच्या नऊ अशा 12 नवजात शिशूंवर उपचार करून त्यांच्या वजनात वाढ करण्यात आली आहे. ह्दयाशी संबंधित आजार असलेल्या दोन शिशूवर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी दिवसांच्या 60 बाळावर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विविध आजारांकरिता रूग्णालयात दाखल झालेल्या शिशूंवर उपचार करण्यात आलेले आहेत. या कार्यवाहीमध्ये वैद्यकिय अधिक्षक डॉ, उध्दव खिल्लारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे व प्राध्यापक डॉ. संध्या खडसे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
आरोग्य सेवेचे सक्षमीकरण
महापालिकेच्या चार रूग्णालयांतील नवजात अतिदक्षता विभाग व लेबर वार्ड सुविधांमध्ये 50 बेड्सची मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने तेथील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण झाले असून यामुळे अधिक नागरिकांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत आहे.