खारघर : प्रतिनिधी
मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. अशा पालकांवर कारवाई देखील होऊ शकते. बीडमधील ऊसतोड मजूराच्या अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे तिच्या कोल्हापुरात प्रसूतीनंतर उघड झाले. प्रसूती झाली त्यावेळी तिचे वय 17 वर्षे 14 दिवस होते. या प्रकारानंतर हा विषय चर्चेत आला आहे. लग्नाच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह जमविण्याचा प्रक्रियेत सहभाग घेतला अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र या कायद्यात स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. पनवेलसह रायगड जिल्ह्यात अशी प्रकरणे घडली आहेत. यासंबंधी न्यायालयात खटलेदेखील सुरू आहेत. आईच्या कमी वयामुळे बाळ किंवा आई यांना प्रसूतीवेळी आपले जीवदेखील गमवावे लागले असल्याचे उदाहरण पनवेलमध्ये घडले आहेत.आदिवासी समाजात हे प्रमाण सार्वधिक आहे.