Breaking News

माझ्या विजयासाठी महायुती खंबीर

ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा

पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील प्रचारसभेमध्ये केला. या वेळी अनेक वक्त्यांनी काँगे्रस आघाडीच्या उमेदवारावर हल्लाबोल केल्याने या सभेची चर्चा सवाद सप्तक्रोशीमध्ये होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळी पोलादपूर तालुका अधिक मतदान करून गीते यांना मोठी आघाडी देईल, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. मुस्लिम मतदारांचा विशेषतः मुस्लिम महिलांचा सन्मान करण्याचे काम आमदार भरत गोगावले यांनी केले असल्याचे सांगून उमेश कालेकर यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांच्यावर कडाडून टीका केली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, महिला आघाडी जिल्हा संघटक वैशाली भूतकर, अश्विनी गांधी, संदीप ठोंबरे, कुमार जैतपाल, पद्माकर मोरे, उमेश कालेकर, शौकत तारलेकर, मनोज भागवत यांच्यासह शिवसेना, भाजप महायुतीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील धारवली, कालवली, सवाद, माटवण, हावरे, भोराव सप्तक्रोशीतील असंख्य महिला, पुरुष या वेळी खालूबाजा व ताशांच्या निनादात या जाहीर प्रचार सभेला उपस्थित होते.

माहिती उपसंचालकांची माध्यम केंद्राला भेट

अलिबाग : कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी सोमवारी (दि. 15) अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीच्या कक्षास भेट देऊन पाहणी केली व आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील समजावून घेतला. जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी पेड न्यूज, माध्यम प्रमाणीकरण व आचारसंहिता भंगाबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे माध्यम कक्षाचे काम चालावे, तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी माध्यमांसाठी आवश्यक ती सर्व सुविधा असण्याची खात्री करावी, असे उपसंचालक डॉ. मुळे यांनी सांगितले.

उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्चविषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही यांची तपासणी करण्यात येते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी सुरू झाली आहे. 20 एप्रिल आणि 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान आकुर्डी, पुणे येथील कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.

आचारसंहितेचे पालन करा

पेण : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. रायगड मतदारसंघातही निवडणूक निर्णयअधिकारी डोळ्यात तेल घालून त्या दृष्टीने कार्यरत आहेत. कोणीही आचारसंहिता भंग करू नये, असे सूचित करण्यात आले आहे.

महायुतीच्या प्रचाराचा कर्जत तालुक्यात झंझावात

कर्जत : बातमीदार : शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग पिंजून काढला. गावोगावी भेटी देऊन मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा त्यांनी उपस्थित जनतेसमोर मांडला. या वेळी सर्व स्तरातील मतदारांनी त्यांना विजयी होण्याचा विश्वास दिला. माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सरचिटणीस राजाराम शेळके, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, माजी नगरसेविका यमुताई विचारे, पं. स.चे माजी उपसभापती मनोहर थोरवे, संघटक राजेश जाधव, रमेश सुर्वे, विष्णू झांजे, ज्ञानेश्वर भालीवडे, दिलीप ताम्हाणे, विनायक पवार, संतोष घाडगे, नीलेश पिंपरकर, विजय चवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रचार दौर्‍यात सहभागी झाले होते. कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रुपग्रामपंचायतच्या नांगुर्ले गावातून प्रचार दौर्‍यास सुरुवात झाली. मोहिली, तमनाथ, नेवाळी, आवळस, बीड बुद्रुक, चोची, कोंदिवडे, खांडपे, पोसरी, कशेळे, खांडस, वारे आदी गावांमध्ये जाऊन श्रीरंग बारणे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. या वेळी महिलांनी बारणे यांचे औक्षण करून स्वागत केले, तसेच ‘महायुतीचा विजय असो’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’च्या जयघोषात बारणे यांचे स्वागत करून येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास दिला. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बारणे यांनी केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

गीते यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार

भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांचा विश्वास

मुरूड : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना या वेळी पूर्वीपेक्षा जास्त मतदान होऊन ते मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र व राज्यातील युती सरकारने पारदर्शक कारभार करून गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. युतीची सत्ता लोकांना भावली असून, केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही, असे आण्णा कंधारे यांनी या वेळी सांगितले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरत असून, महायुतीचे उमेदवार गीते हे जास्तीत जास्त मतांनी निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. रायगड जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मन लावून काम करीत असून, गीते यांना जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याची माहिती आण्णा कंधारे यांनी या वेळी पत्रकारांना दिली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केलेल्या कामांमुळे मुरूड तालुक्यात भाजपच्या मतांत खूप मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपची 1500 ते 2000 मते तयार झाली आहेत. मुरूड तालुक्यसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपची निर्णायक मते असून, ही सर्व मते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना पडणार असून, ते मोठ्या फरकाने निवडून येतील व सातव्यांदा खासदार होतील, असा विश्वास आण्णा कंधारे यांनी व्यक्त केला. मागील लोकसभा निवडणुकीत अनंत गीते हे जरी 2100 मतांनी विजयी झाले असले, तरी परिस्थिती तीच राहिलेली नाही. मुरूड नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता असून, शहरातील भाजपची सर्व मते गीते यांना पडणार असल्याने मुरूड शहरात एक नंबरची मते आमचीच असतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे शांत स्वभाव व स्वच्छ चारित्र्याचे असल्याने सुशिक्षित मतदार व युवकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यामुळे गीते यांचा विजय निश्चित असल्याचे आम्ही मानत आहोत, असे कंधारे यांनी सांगितले.

यापूर्वीच्या सरकारला 50 वर्षांत जमले नाही, ते मोदी सरकारने पाच वर्षांत केले -खासदार बारणे

कर्जत : बातमीदार : यापूर्वी 50-55 वर्षे देशाची सत्ता उपभोगलेल्या सरकारने जे केले नाही, ते नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या 5 वर्षात केले असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील निवडणूक प्रचार कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे बोलत होते. श्रीरंग बारणे पुढे म्हणाले की, ब्रिटिशांनी केलेले परंतु आजच्या घडीला कोणत्याही कामाचे नसलेले आणि कालबाह्य झालेले 250 कायदे बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले. देश स्वतंत्र झाल्यापासून देशात सत्तेवर असलेल्यांचे त्या कायद्याकडे बघण्यापेक्षा भ्रष्टाचार करण्याकडे जास्त लक्ष होते, असा आरोप करून बारणे यांनी, मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती, याची आठवण करून दिली. रायगड जि. प.च माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत सभापती राहुल विशे, पं. स. सदस्या सुजाता मनवे, नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, महेंद्र थोरवे, रेखा ठाकरे, वसंत भोईर, दीपक बेहरे, संतोष भोईर, संभाजी जगताप, सावळाराम जाधव, राजेश जाधव, समिधा टिल्लू, गजुभाई वाघेश्वर, पंढरीनाथ राऊत, माधव गायकवाड, अब्दुल्ला नजे, अनंत धुळे, अमर मिसाळ, प्रवीण पोलकम, राजेश भगत, शशिकांत मोहिते आदी महायुतीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पोलादपूर, लोहारे व तुर्भे खुर्द येथे पथनाट्यातून मतदार जनजागृती

पोलादपूर : प्रतिनिधी : येथील बसस्थानक, तसेच लोहारमाळ आणि तुर्भे खुर्द गावात प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी ‘मतदान एक जबाबदारी’ या पथनाट्यातून जनजागृती केली. लोकसभेच्या मतदानाकरिता सर्व नागरिकांनी सज्ज होऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन या पथनाट्यातून करण्यात आले. पोलादपूर एसटी स्थानकाच्या शेडमध्ये आबालवृद्ध प्रवाशांनी या पथनाट्यातून बोध घेतला. या वेळी मंडल अधिकारी खेडेकर, तलाठी महाडिक आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्यासह तुर्भे खुर्द श्री राममंदिरामध्ये मुख्याध्यापक रामदास उतेकर, संदेश कदम, तसेच महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लोहारमाळ येथे रामचंद्र उतेकर, यांच्यासह ग्रामस्थ, तसेच रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले. पथनाट्याचे नेतृत्व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी करीत असून, पथनाट्यात नेहा तुपे, प्रतिक कोळी, विराज म्हात्रे, वेदांत कंटक, प्रसाद अमृते, प्रांजली पाटील, अक्षता सोडेकर, विशाखा चव्हाण, श्वेता खारकर, राज राणे आदी कलाकार सहभागी झाले होते.

रेवदंडा, मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन

रेवदंडा, मुरूड : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा आणि मुरूडमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि. 15) सायंकाळी संचलन केले रेवदंडा बाजारपेठेसह चौल, बोर्ली विभागात झालेल्या संचलनात   अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निगोंट, रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनील जैतापूरकर, उपनिरिक्षक हर्षद हिंग व पोलीस कर्मचारी, तसेच दंगा नियंत्रक पथक यांचा सहभाग होता, तर मुरूडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निगोंट यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संचलनात पोलीस निरीक्षक किशोर साळे, उपनिरीक्षक विजय गोडसे व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी शहरासह मजगाव व राजपुरी  परिसरात संचलन केले. त्यात चार अधिकार्‍यांसह 40 पोलीस कर्मचारी सहभागी होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply