Breaking News

अंगणवाडी सेविकांनी मोबाइल केले राज्य शासनाला परत

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्यातील अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत केले.
अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयात असलेल्या महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकार्‍यांना आपले मोबाइल परत केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने निवेदनही दिले आहे. आम्हाला नवीन मोबाइल द्या, अ‍ॅप मराठीमधून असावा आणि रजिस्टर द्या आदी मागण्या या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना 2019 साली पॅनसोनिक कंपनीचे मोबाइल देण्यात आले होते. यासोबत सिमकार्ड आणि मोबाइल रिचार्ज खर्च शासनामार्फत दिला जात होता. अंगणवाडी सेविकांना मोबाइलमध्ये पोषण ट्रेकर अ‍ॅप देण्यात आले होते. या अ‍ॅपमध्ये मराठीत पोषण आहार, मुलांची, स्तनदा माता, लसीकरण, सर्व्हे याची माहिती भरली जात होती, पण काही दिवसांनी मोबाइलला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ते बंद पडू लागले. अनेक अंगणवाडी सेविकानी स्वतः दोन ते तीन हजार रुपये खर्च करून रिपेअर करून घेतले, मात्र तुटपुंज्या मानधनामुळे हा खर्च सेविकांना परवडणारा नाही.
पोषण ट्रेकर अ‍ॅपमध्ये बदल करण्यात आला असून हे अ‍ॅप आता इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती इंग्रजीत भरावी लागत आहे. अनेक अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अंगणवाडीसेविका काम करीत असताना त्यांना गावाचा सर्व्हे करून माहिती घ्यावी लागते आणि ती अ‍ॅपमध्ये भरावी लागते, मात्र नवीन अ‍ॅपमध्ये सर्व्हे ऑप्शन दिला नसल्याने माहिती अपूर्ण राहते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण होत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply