भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण महिला क्रिकेट खर्या अर्थाने नावारूपाला येण्यासाठी त्याला आयपीएलसारख्या वलयाची गरज होती. आणि भारतातल्या महिलांच्या पहिल्यावहिल्या आयपीएल अर्थात डब्ल्यूपीएलने क्रिकेटविश्वात महिलांची खरी दमदार वाटचाल सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. अनेक ठिकाणी त्यासाठीच्या कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गाण्याचा हा मौसम. तो येण्याच्या जवळपास महिनाभर आधीच खर्याखुर्या स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने क्रिकेटविश्वाने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला क्रिकेटचे सामने वाढवले. त्यानंतरच महिलांची आयपीएल झाली पाहिजे अशी चर्चा सुरू झाली. आता अखेर ही लीग मार्चमध्ये होणार आहे. त्यासाठी सोमवारी पहिल्यांदाच पाच संघांच्या मालक-मालकिणींनी बोली लावून आपल्या संघातील क्रिकेट तारकांची निवड केली. यात भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाला सर्वाधिक 3.4 कोटी रूपयांचा करार मिळाला. सांगलीनजीकच्या स्मृतीसाठी रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू या संघाने ही भलीमोठी रक्कम मोजली आहे. महिला क्रिकेटपटूंसाठीच्या या पहिल्याच लिलावात पाच संघांनी मिळून तब्बल 87 कोटी रूपयांहून मोठी रक्कम खर्च केली. स्मृतीला मिळालेली रक्कम महिला खेळाडूंमध्ये खूप मोठी असली तरी काही जण त्याची तुलना पुरुषांच्या आयपीएलशी करीत आहेत. पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळालेल्या रकमा काहीच नाहीत हे कुणीही नाकारणार नाही. पण ही तर निव्वळ सुरूवात आहे. त्यामुळे या सार्याचेच सकारात्मकतेने स्वागत करायला हवे. महिला लीग अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र आयपीएलसारखीच ही लीगही नावारूपाला येणार याची खात्री या क्षेत्रातील सर्व जाणत्या मंडळींना वाटते. यातला परदेशी खेळाडूंचा सहभाग महिला क्रिकेटच्या प्रगतीला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. जेमिमा रॉडरिग्ज, शेफाली वर्मा आदी आणखी काही क्रिकेटतारकांचे करार कोटींच्या घरातले आहेत. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी मुंबई इंडियनने 1.8 कोटी रूपये मोजले. सर्वाधिक रकमेचा करार मिळवणार्या भारतीय क्रिकेटतारकांच्या यादीत ती पहिल्या सहा खेळाडूंमध्येही नाही. तिच्यासारख्या अनुभवी खेळाडूकरिता हे निश्चितच निराशाजनक आहे. अर्थात इथून पुढे भारतीय क्रिकेटच्या सार्याच तारकांना दरवर्षी स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. सत्तरच्या दशकात भारतातील महिला क्रिकेट खेळू लागल्या तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेटचा मार्ग आजवर खडतरच राहिला आहे. डायना एडुलजी, शांता रंगास्वामी, मिताली राज या महिला क्रिकेटपटूंनी या कठीण काळात आपला खेळ नुसता सुरू ठेवला नाही तर आपली गुणवत्ताही सिद्ध केली. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यात आयपीएल हा खेळापेक्षाही व्यवसायच अधिक आहे हे सारेच जाणतात. आपल्या लक्षवेधी कामगिरीने महिला क्रिकेटपटूंनी त्यात स्वत:साठी स्थान मिळवले आहे हे मान्य करावेच लागेल.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …