मूर्तीचोरीप्रकरणी आमदार रविशेठ पाटीलांची पोलिसांशी चर्चा
पेण ः प्रतिनिधी
पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मुर्ती व पादुका 8 फेब्रुवारी रोजी मंदिरातून चोरीला गेली आहे. सात दिवस उलटूनदेखील चोरट्यांचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि. 14) पेण कोळी वाड्यातील बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपले निवेदन दिले. कोळीवाड्यातील आई एकविरा देविच्या मंदिराजवळून मूक मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा अंतोरा रोडमार्गे कोतवाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकावरून पोलीस ठाण्यात नेण्यात आला. पंचकमिटी कोळी समाजातर्फे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आई एकविरा देवीची चांदीची दिड फूटाची मूर्ती चोरीस गेल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर चोराला पकडून योग्य तो शासन व्हा व आईची मूर्ती व पादुका परत मिळावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान कोळी समाज पंच कमिटी सदस्यांनी आमदार रविशेठ पाटील यांची भेट घेऊन या चोरीच लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी करून निवेदन देण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील उपस्थित होत्या. आमदार रविशेठ पाटील यांनी त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पोलीस यंत्रणेने युद्धपातळीवर तपास करावा असे सांगितले. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले की, आम्ही वेगवेगळ्या तीन टीम केल्या असून शोधमोहीम सुरू आहे. आधुनिक यंत्रणेचा वापर करीत आहोत. सायबर बॅच आम्हाला मदत करीत आहेत. लवकरात लवकर चोराला पकडण्यात येईल.