पाली येथे भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक उत्साहात
धाटाव : प्रतिनिधी
भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात झाली.
भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रयुक्त पदाधिकारी, पेण तालुका सोशल मीडिया संयोजक निशिगंधा गुंड यांना प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. माणगाव तालुका अंगणवाडी सेविका प्रणाली प्रदीप मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी प्रज्ञा ढवण यांनी, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांच्या संघटनाकरीता ध्येयधोरण आणि विचारधारेचा प्रचार करून पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. रायगड जिल्हा महिला भाजप आघाडी अध्यक्ष हेमा मानकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये रायगड जिल्हा महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेल्या लाभदायी उपक्रमाची माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रत्येक महिला पदाधिकार्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप महिला आघाडी पूर्ण ताकदीने उतरून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादित करून भाजप या जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास हे जिल्हाध्यक्ष हेमा मानकर यांनी व्यक्त केला. या वेळी लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा, श्रेया कुंटे, सरचिटणीस श्रद्धा घाग, उपाध्यक्ष वैशाली मपारा, सरचिटणीस वंदना म्हात्रे व जांभूळपाडाचे सरपंच श्रद्धा कानडे, नीलिमा भोसले, दीप्ती नकाशे, नंदा नाक्ते यांसह महिला आघाडी पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.