देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान -भीमराव इंगळे
अलिबाग : प्रतिनिधी : देशाच्या उभारणीत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी अनेक योजना सुचविल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांचे ऐकले असते तर देश सुजलाम, सुफलाम झाला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव इंगळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरसीएफ थळतर्फे रविवारी कुरुळ (ता. अलिबाग) येथील आरसीएफ वसाहतीमध्ये विचार प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात भीमराव इंगळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठीच काम केले असे नाही, तर त्यांनी देशातील सर्व जनतेसाठी काम केले असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेला नदीजोड प्रकल्प व्यवस्थित राबविला गेला असता, तर आज देशाला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता, असे मत भीमराव इंगळे यांनी या वेळी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोल विचार आपण आचारणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक रवींद्र जावळे म्हणाले. त्यापूर्वी विश्वशांती बुध्दविहारात भंते नागार्जुन यांचे व्याख्यान झाले. बुध्द तत्त्वज्ञान आणि डॉ. आंबेडकर तत्त्वज्ञान वेगळे नसून दोन्ही तत्त्वज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत जी तत्त्वे घेतली आहेत, ती बुध्दांची तत्त्वे आहेत, असे भंते नागर्जुन म्हणाले.संजय वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब खंडाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भंते सुमंगल, आरसीएफ थळचे महाव्यवस्थापक विनायक फडणवीस, हेमंत कुलकर्णी, सत्यवान दहीवले, आरसीएफ ऑफिसर्स असोसिएशनचे मिलींद सोनारकर, आरसीएफ कर्मचारी सेनेचे सेक्रेटरी संजय रावळे, आरसीएफ कर्मचारी संघटनेचे (इंटक) संतोष म्हात्रे, एससी एसटी असोसिएशनचे शिरीष राजके, आरसीएफ कर्मचारी संघाचे (बीएमएस) अजय रघुवंशी आदी या वेळी उपस्थित होते. आरसीएफ थळचे जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम तडवळकर यांनी आभार मानले. दिनेश कवाडे, बापूराव मुरकुटे, राजेंद्र पाटील, शैलेंद्र काळे, विनोद काळे, उज्ज्वल भास्कर, ज्ञानदीप महिला मंडळाच्या उज्ज्वला वानखेडे, ज्ञानदीप महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते, विश्वशांती बुध्दविहार समितीचे पदाधिकरी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यांच्याकडे केवळ दलितांचे नेते म्हणून न पाहता देश घडविणारे नेते म्हणून पाहिले पाहिजे.-भीमराव इंगळे, ज्येष्ठ साहित्यिक
अलिबागेत सलग 12 तास अभ्यास करण्याचा उपक्रम
अलिबाग : प्रतिनिधी : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (दि. 14) सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असा सलग 12 तास अभ्यास करून अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यात 60 विद्यार्थी, 11 प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.सकाळी नऊ वाजता प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे 18-18 तास अभ्यास करायचे त्याच विचाराने नियमितपणे ग्रंथालयाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याबद्दलची भूमिका त्यांनी विषद केली. उपप्राचार्य प्रा. अविनाश ओक यांचेही या वेळी भाषण झाले. करियर गायडन्स व प्लेसमेंट प्रमुख प्रा. डॉ. बी. आचार्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. श्वेता एस. पाटील यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले. या वेळी ग्रंथालयाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील साहित्य, ग्रंथ व इतर विषयांवरील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुबोध डहाके, कर्मचारी डी. बी. स्थळे, बी. के. सगळे, संतोष घातकी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी सहकार्य केले.
जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचे डॉ. आंबेडकरांना अभिवादन
अलिबाग : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 14) त्यांना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, तहसीलदार सतीश कदम तसेच इतर कर्मचार्यांनी या वेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले.
पेण न. प.तर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी
पेण : प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पेण नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि.14) उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सामुदायिक बुद्धवंदना करण्यात आली, तसेच शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पेण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राजाराम नरुटे, बांधकाम अभियंता प्रवीण कदम, लेखानिरीक्षक काळे, पाणीपुरवठा अभियंता अंकिता इसाल, पथदीप अभियंता रेश्मा करबिले, आरोग्य विभागाचे दयानंद गावंड, वसुली विभागाचे शेखर अभंग, पथदीप विभागाचे शिवाजी चव्हाण, सामान्य प्रशासनाचे भरत निंबरे, पाणीपुरवठा विभागाचे रमेश देशमुख, भांडार विभागाचे महेश वडके आदींसह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
महाडमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
महाड : प्रतिनिधी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाड शहरातील चवदार तळे परिसरात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक दाखल झाले होते. चवदार तळे येथून भीमज्योतीदेखील प्रज्वलित करून नेण्यात आल्या. महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची क्रांती केली. यामुळे गेली अनेक वर्षे महाडमध्ये महामानवाची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पदाधिकार्यांनी चवदार तळे येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. शहरात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकदेखील काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येते. तालुक्यातील विविध गावांतील आखाडे या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आचारसंहिता असल्याने यावर्षी विविध राजकीय पक्षांचे फलक मात्र लागले नाहीत.
नागोठणे ग्रा. पं. कार्यालयात डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन
नागोठणे : प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथील ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (दि. 14) साजरी करण्यात आली. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंके, कल्पना टेमकर, भक्ती जाधव, रूपाली कांबळे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, कार्यालयीन निरीक्षक पांडुरंग कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.