अंटार्क्टिकातील हिमाच्छादित आवरण झपाट्याने कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या नोंदीतून यंदा गेल्या वर्षीपेक्षा काहिसे लवकरच ध्यानात आले असून यापूर्वी कधीही तिथे इतकी टोकाची परिस्थिती आढळलेली नाही असे निरीक्षण ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. तेथील हिम वितळण्याचा मौसम संपण्यास काही आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना विक्रमी बदल नोंदला गेल्याने जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा विळखा पृथ्वीला किती वेगाने बसत चालला आहे हे अधोरेखित होते. शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकाच्या परिसराचे निरीक्षण करण्यास कैक वर्षांपूर्वी सुरूवात केली. सुमारे 1979 पासूनची निरीक्षणे आज शास्त्रज्ञांकडे तुलना करण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रदीर्घ काळ हा परिसर किती कमालीचा प्रदूषणमुक्त, कुठल्याही तर्हेच्या बदलांपासून दूर आणि स्थिर असल्याचे शास्त्रज्ञांच्या ध्यानात आले होते. येथील हिमाच्छादित आवरणाची आकडेवारी प्रतिवर्षी बरीच बदलत आली. त्यामुळे बराच काळ त्याची जागतिक तापमानवाढीशी सांगड घालणेही शक्य झाले नव्हते. पण दीर्घ काळ स्थिर असलेला हा परिसर गेल्या अवघ्या सहा वर्षांत मात्र झपाट्याने बदलू लागला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकातील हिमनग व समुद्र वितळू लागले असून तेथील हिमाच्छादित प्रदेशात मोठी घट दिसू लागली आहे. समुद्रातील पाण्याच्या तापमानात झालेली वाढ, त्याचे जागतिक हवामानबदलात दिसू लागलेले परिणाम आणि आता अंटार्क्टिकातील हिमाच्छादित प्रदेशात दिसू लागलेली नीचांकी घट या सार्याबद्दल शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. जागतिक स्तरावरील या मोठ्या धोक्याकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही. हिमाच्छादन कमी झाले याचा अर्थ आता अधिक मोठ्या प्रमाणात हिमनद्या व हिमखंड वितळत असून जागतिक तापमानात अवघी 1 सेल्सिअसची वाढ झाली तरी समुद्रातील पाण्याची पातळी तब्बल चार मीटरने वाढू शकेल असा इशारा एका ताज्या अहवालात देण्यात आला आहे. जगभरातील समुद्रानजीकच्या भूभागांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो आहे. 1994 साली अंटार्क्टिकाला सर्वप्रथम भेट देणारे जर्मन शास्त्रज्ञ प्रा. कार्स्टन गोह्ल यांनी आपण इतकी टोकाची हिममुक्त परिस्थिती तिथे कधीही पाहिलेली नाही असे चिंतित उद्गार काढले आहेत. जवळपास जर्मनीच्या आकाराएवढा प्रदेश तेथे आता संपूर्णत: हिममुक्त दिसतो आहे. हा बदल इतक्या कमी काळात घडून आला हेच चिंतेत अधिक भर टाकणारे आहे असेही त्यांनी नमूद केले. सहा वर्षांचा कालावधी फारच कमी असल्यामुळे बदलांच्या वेगाबद्दल शास्त्रज्ञांना अधिक चिंता वाटताना दिसते. सहा वर्षांपूर्वीच्या तब्बल 35 वर्षांत तेथे असा कुठलाही बदल नोंदला गेला नव्हता आणि आता अवघ्या सहा वर्षांत हिमाच्छादन एवढे मोठ्या प्रमाणात कमी व्हावे याबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. सलग दुसर्या वर्षी अंटार्क्टिकातील हिमाच्छादनात नीचांकी घट नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी हिमाच्छादन 1.92 दशलक्ष चौरस किमी इतके होते. यंदा 13 फेब्रुवारीलाच अंटार्क्टिक समुद्रातील हिमाच्छादन घटून 1.91 चौरस किमी इतके झाले आहे. आणखी काही आठवडे उन्हाळा कायम राहणार असल्याने तेथील हिमाच्छादन यंदा आणखी घटणार हे उघड आहे. भारताने अलीकडेच भारतीय अंटार्क्टिक विधेयक मंजूर केले होते. जागतिक हवामानबदलाच्या दुष्परिणामांना रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये हातभार लावण्यास भारतही सरसावतो आहेच. या प्रयत्नांमध्ये तमाम भारतीयांनाही सजगपणे सहभाग घेण्याची आवश्यकता आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …