22 जुलै 2021 रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नैसर्गिक प्रकोपाला संपूर्ण जिल्हा बळी पडला. त्याचवेळी महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दरडीच्या ढिगार्याखाली 66 घरे गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम प्रशासनाने जोमाने सुरू केले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू असून सर्व घरांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराकडून वारंवार मुदत वाढवली जात असल्याने ग्रामस्थांना गृहप्रवेश करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता आहे.
तळीये येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम जरी सुरू करण्यात आले असले तरी काम अद्याप पूण न झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. म्हाडाच्या ट्रांसकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यामतून दरडग्रस्तांची घरे उभारण्याचे काम केले जात आहे. 271 घरांसह शाळा इमारत, रस्ते, पाणीपुरवठा, समाजमंदिर बांधले जात आहे. आतापर्यंत 17 घरांची कामे झाली आहेत, तर 100 घरांच्या जोत्याची कामे झाली आहेत. त्या ठिकाणी एकूण 271 घरे उभारण्यात येणार आहेत, ही घरे 2023 पर्यंत पूर्ण होऊन बाधित कुटुंबे आपल्या नवीन घरात राहायला जातील असा विश्वास संबंधित ठेकेदाराकडून व्यक्त केला जात आहे. सध्या कंटेनरमध्ये राहत असलेली 25 कुटुंबे मार्च अखेर तर उर्वरित 41 कुटुंबीयांना प्राधान्याने लवकरात लवकर घरे बांधून देण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
सुरुवातीला ज्या ठिकाणी गाव अस्तित्वात होते त्या ठिकाणी पुनर्वसन करावे असा आग्रह धरण्यात आला होता, परंतु त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे गावापासून थोड्या अंतरावर जवळच पुनर्वसनाकरिता जागा संपादित करण्यात आली. याठिकाणी 66 कुटुंबे नष्ट झाली आणि उर्वरित कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे एकूण 271 घरे राज्य सरकारच्या प्रयत्नातुन उभी करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला 623 चौरस फूट क्षेत्राची घरे देण्यात येतील. ही घरे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणारी भूकंपावरोधक शिवाय तापमानाचे संतुलन राखणारे असतील याकरिता घरांच्या छपराकरिता पफ पॅनलचा वापर करण्यात येत आहे. म्हाडाने घरे उभारण्याचे काम ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले असून आत्तापर्यंत 120 घरांचा पाया व भिंती उभारण्याचे काम सुरू करण्यात आला आहे. या महिना अखेर 200 घरांचे प्राथमिक काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरे बांधण्याचे काम म्हाडाने घेतले असले तरी मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, आरोग्य सुविधा इत्यादींचा समावेश आहे. मुळात काम सुरू करताना कंटेनरमध्ये राहत असलेल्या कुटुंबीयांना जानेवारी अखेर नवीन घरे मिळतील असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात फक्त सतरा जणांची प्राथमिक उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये आतील कामे वीजपुरवठा, पाणीपुरवठा इत्यादी सोयी सुविधांची कामे अपूर्ण असल्याची माहिती तांदलेकर यांनी दिली. तसेच दिवाळीपूर्वी घरांचा ताबा मिळणे कठिण असल्याचे कामाची गती यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एकंदर कामाची गती आणि दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला पावसाळा पाहता तळीयेकरांना गृहप्रवेशासाठी प्रतीक्षा करावी करावी लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
-महेश शिंदे