Breaking News

‘नाटु नाटु’चा नादखुळा

ज्या क्षेत्रांना कोरोना कालखंडाच्या सावटातून बाहेर पडणे अजुनही पुरते जमलेले नाही अशा क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे चित्रपट क्षेत्र होय. त्यामुळेच येथील प्रत्येक यश या क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठी उमेद देणारे ठरते. या पार्श्वभूमीवर आज दोन भारतीय चित्रपटांनी ‘ऑस्कर पुरस्कारां’च्या मंचावर केलेली कामगिरी चित्रपट क्षेत्राशी संबंधितांनाच नव्हे तर तमाम भारतीयांना हर्षभरित करून गेली. यातील एक ऑस्कर पुरस्कार ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटातील गाजलेल्या ‘नाटु नाटु’ या गाण्याला मिळाला तर दुसरा ऑस्कर ‘एलिफण्ट विस्परर्स’ या भारतीय लघुपटाला.

राजामौली यांच्या ‘आरआरआर’मधील ‘नाटु नाटु’या गाण्याचा तर गेले कित्येक दिवस पाश्चिमात्य मनोरंजन विश्वात गवगवाच झाला होता. ‘नाटु नाटु’ने गेल्याच महिन्यात प्रतिष्ठेचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्डही पटकावल्यानंतर यंदाच्या 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट ओरिजिनल साँग’साठीचा पुरस्कार ‘आरआरआर’लाच मिळणार याची खात्री अनेकांना वाटतच होती. त्यातच प्रत्यक्ष ऑस्कर सोहळ्यात राहुल सिप्लीगुंज आणि कालभैरवा या गायकद्वयीने हे गाणे सादर केले आणि त्यावर पूर्णत: नजरबंदी करणारा जो नृत्याविष्कार सादर झाला, त्याने लॉस एंजलिसच्या दिमाखदार डॉल्बी सभागृहातील प्रेक्षक इतके भारावून गेले की अगदी स्वाभाविकपणे या नृत्याविष्काराला सगळ्यांनी उभे राहून मानवंदना दिली. त्यानंतर पुरस्कारासाठी ‘नाटु नाटु’च्या नावाचा पुकारा होणे काहिसे अपेक्षितच होते. मात्र 2023च्या ऑस्कर पुरस्कारांवर भारताचे नाव त्याआधीच कोरले गेले होते, ते लघुपट ‘एलिफंट विस्परर्स’मुळे. सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा ऑस्कर पटकावणारा हा लघुपटही दक्षिण भारताशीच संबंधित आहे. हत्ती हा दक्षिण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. दक्षिण भारतातील केरळ या राज्यातील जंगलात राहणारे बोम्मन आणि बेली हे जोडपे रानटी हत्तींना कसे अगदी आईबापाच्या मायेने सांभाळते याची सत्यकहाणी या लघुपटातून सांगितली आहे. अवघी सृष्टी ही आपल्याच उपभोगासाठी आहे असे गृहित धरून मानवाने गेली हजारो वर्षे निसर्गसंपत्तीची लयलूट केल्याची फळे आपण आता भोगू लागलो आहोत. त्यामुळेच अन्य प्राण्यांसह आपण सारेच या सृष्टीचा एक भाग आहोत हा संदेश देणारा हा लघुपट महत्त्वाचा ठरतो. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुणित मोंगा यांनी नेटफ्लिक्सकरिता बनविलेला हा लघुपट आता सगळ्यांनी आवर्जून पहायला हवा. ‘आरआरआर’च्या बाबतीत मात्र असे आवाहन करण्याची अजिबात गरज नाही. इतके अफाट यश या चित्रपटाने अवघ्या देशभरात कमावले आहे. कोरोनाच्या विळख्यातून देश पुरता बाहेरही पडला नव्हता तेव्हा गेल्या 25 मार्चला तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नड इतक्या भाषांतून ‘आरआरआर’ रीलीज झाला. कोरोना काळात प्रेक्षकांची थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची सवय पार सुटली होती. अशात निव्वळ दक्षिणेतच नव्हे तर हिंदी भाषिक पट्ट्यातही बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करीत पुढे जागतिक स्तरावरही हा चित्रपट 1000 कोटींच्या पुढची कमाई करणार्‍या चित्रपटांच्या गोटात शिरकाव करता झाला. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आरआरआर’मधील ‘नाटु नाटु’ची एनर्जी, त्याचे ठेका धरायला लावणारे संगीत आता जगाच्या कानाकोपर्‍यातील नृत्यप्रेमींना नादावते आहे. ऑस्कर पुरस्कारामुळे जगभराच्या नजरा आता भारतीय चित्रपट संगीताकडे अधिक प्रेमभराने वळतील यात शंका नाही.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply