Breaking News

होय म्हाराजा…

लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ जाहीर झाला आणि सगळ्या राजकारणी खेळाडूंच्यात उत्साह संचारला. म्हातारे कोतारे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. अडगळीच्या खोलीत ठेवलेले नेत्यांचे फोटो बाहेर आले. लख्ख पुसून भिंतीवर टांगले गेले.  मतदारराजाला सुगीचे दिवस आले. त्यातच होळीचा सण आल्याने सगळ्या पक्षांचे नेते कोकणात  देवाक गार्‍हाणे घालायला आलं. गावच्या होळीवर मानकरी गार्‍हाणे घालत होता. हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा…होय म्हाराजा…आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान् साजारो करतत, तेंचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे म्हाराजा…होय म्हाराजा…कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघान जाऊं दे रे म्हाराजा…होय म्हाराजा…कोणाक पोर होत नसात तर त्याका पोर होऊ दे, कामधंद्यात सर्वाकां यश दे, पोराटोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमादें रे म्हाराजा… होय म्हाराजा…हे देवा म्हाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरींनवर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नायनाट कर रे म्हाराजा…होय म्हाराजा…बोला होळी रे होळी, पुरणाची पोळी. संधी साधण्यात हुशार असलेले शरद पवार लगेच पुढे सरकले. त्यांनी  देवाक गार्‍हाणे घालायला सुरुवात केली  हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा…होय म्हाराजा…मी राजकरणात इतकी वर्षा घालवली पन माका प्रधानमंत्री होता नाय आलं. यंदा माका एक दिसाचो का नय पण प्रधानमंत्री होऊ दे रे..  म्हाराजा…होय म्हाराजा…काकांच्या डोळ्यात आलेल पानी पाहून रेल्वे इंजिनवाले राज ठाकरे पुढे आले. त्यांनी देवाक गार्‍हाणे घालायला सुरुवात केली. देवा म्हाराजा बारामतीकर शरदकाकांना प्रधानमंत्री करण्यासाठी मी माझ्या तमाम मराठी माणसांच  रेल्वे इंजिन त्यांच्या सेवेला दिल  रे… म्हाराजा… होय म्हाराजा… यंदा त्यांना प्रधानमंत्री बनण्याचा एक चान्स दे रे… म्हाराजा…होय म्हाराजा. त्याच वेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण तिथे आले. त्यांनी आघाडीचा धर्म पाळणे गरजेचे असल्याने त्यांनीही देवाक गार्‍हाणे घालायला सुरुवात केली. हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा…होय म्हाराजा…आम्ही आघाडीचा धर्म पाळण्याचे ठरवले पण माझ पक्षात कोण ऐकत नाही रे म्हाराजा…   होय म्हाराजा… अलिबागचे मधुकर ठाकूर अशोकरावांना पाहून तिथे आले. त्यांनी तटकरेंवर आमचा भरवसा नाय, आळवायला सुरुवात केली. त्यांना महाडच्या माणिकरावांनी साथ दिली. ते पाहून अशोकरावांनी म्हाराजा…ता तुझ्या क्रुपेन जमादें रे म्हाराजा…होय म्हाराजा म्हणत तेथून पळ काढला. नाणारला केला हद्दपार म्हणत उध्दवजींनी देवाक गार्‍हाणे घालायला सुरुवात केली. हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा…होय म्हाराजा… राज्यात मोठा भाऊ बनण्यासाठी देवेन्द्रांशी जुळवून घेतला. नरेन्द्रजींना प्रधानमंत्री बनवायला साथ द्यायचा ठरवला म्हाराजा… त्यासाठी आमचं सैनिक निवडून येऊ दे रे म्हाराजा… होय म्हाराजा…कोल्हापूरला प्रचार सभा आटोपून येणारे देवेन्द्रजीही कोकणात आले. त्यांनीही देवाक गार्‍हाणे घालायला सुरुवात केली.  हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा…होय म्हाराजा…आमच्या नरेंद्रजींनी बुध्दिमत्ता आणि उत्तम नेतृत्व कसे असते हे सर्जिकल स्ट्राईक करून आणि ले. अभिनंदनला विनाशर्त परत आणून  जगाला दाखवून दिले. सबका साथ, सबका विकास, घोषणा देताना शेतकरी, असंघटित कामगार, महिला यांच्यासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या म्हाराजा…त्यामुळे त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आम्हाला निवडणुकीत यश दे रे म्हाराजा…होय म्हाराजा…!

नितीन देशमुख (7875036565)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply