Breaking News

कर्जतमधील गरोदर महिलेची हेळसांड

बाळ मृतावस्थेत जन्मले; आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या आदिवासी महिलेवर येथे उपचार न करता तिला उल्हासनगर येथे पाठवून देण्यात आले. त्यामुळे गरोदर महिलेची हेळसांड होऊन तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला आले. या प्रकरणाची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्‍यांनी झटकली आहे. दुसरीकडे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या पीडित कुटुंबियांनी केली आहे. 20 मार्च रोजी कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी येथील गरोदर महिला संगीता विठ्ठल पवार या बाळंतपणासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना आम्ही या ठिकाणी बाळंतपण करू शकत नाही, असे सांगून उल्हासनगर येथील रुग्णालयात जाण्यास सांगितल्याचे कुटुंबियांनी सांगितले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील रुग्णवाहिकेमधून त्यांना पाठवून देण्यात आले. सकाळी नऊ वाजता कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका उल्हानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये बारा वाजण्याच्या सुमारास पोहोचली. तेथे संगीता पवार यांना असह्य कळा येत असतानादेखील रात्री आठ वाजेपर्यंत कोणतेही उपचार केले नाहीत, असा आरोप पवार कुटुंबियांनी केला आहे. उलट तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला पुढील रुग्णालयात न्यायला सांगितले, असे त्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाचा हलगर्जीपणा शेवटी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संगीता पवार यांना रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले. तेथे संगीता पवार यांचे बाळंतपण झाले, पण जन्मलेले बाळ हे मृत होते. शेवटी त्यांना (दि.23) कळवा येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यावर हे कुटुंब आपल्या घरी कर्जत लाखाची वाडी येथे पोहोचले. त्यानंतर (दि.24) कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक आरोग्य सेविका आली. त्यांनी संगीता पवार यांची तपासणी न करता एक केस पेपर देऊन त्या निघून गेल्या. असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, संगीता पवार यांचे बाळंतपण करण्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय यांनी हलगर्जीपणा दाखवला. असा आरोप पवार कुटुंबियांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र

या कुटुंबाने राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आपल्यावर केलेल्या उपचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आपल्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply