Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2021-22चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवारी (दि. 4) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील तहसीलदार राहुल सारंग, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य डॉ एन. आर. मढवी, डॉ आर ए. पाटील, यांच्यासह पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय मनोगतात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतरही पुढील प्रगती करण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबतच ठाण्याचे तहसीलदार राहुल सारंग यांचे उदाहरण देत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा दृष्टिकोन अंगिकारावा, असा मोलाचा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. नागरिक म्हणून जीवन जगताना आपला विचार उच्च ठेवा व गरजूंना मदतीचा हात द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे तहसीलदार राहुल सारंग यांनी, जीवनामध्ये ध्येय निश्चित करून वाटचाल करा, तरच आपण यशस्वी होऊ शकतो व ध्येयपूर्तीसाठी परिश्रमाची तयारी ठेवणे आवश्यक आहे, असे विद्यार्थ्यांना सूचित केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाल्याबद्दल एक विद्यार्थी म्हणून अभिमान वाटत असल्याचे सांगितले. यासोबतच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी हातभार लावणार्‍या सगळ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तसेच महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर व यासाठी महत्त्वपूर्ण हातभार असणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ प्रफुल्ल वशेणीकर व प्रा. प्रवीण गायकर यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply