Breaking News

एनआरआयच्या घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई : बातमीदार
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणार्‍या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कचर्‍यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत स्वच्छता कार्यवाहीकडे विशेष लक्ष दिले जात असून नुकतीच आयुक्तांनी स्वच्छताविषयक आढावा बैठक घेऊन प्रत्येक घटकाने स्वच्छता मोहिमेला अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. यादृष्टीने प्रत्येक विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच विभागनिहाय नियुक्त विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्राचा नियमित पाहणी दौरा करून स्वच्छतेमध्ये जाणवणार्‍या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्याचे त्वरीत निराकरण करण्याबाबत सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
यासोबतच स्वत: आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फतही विविध विभागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. यानुसार आयुक्तांनी आज स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटी प्रोफाईलमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होणार्‍या एनआरआय कॉम्प्लेक्स फेज 2 मधील सीवूड इस्टेट सोसायटीला अचानक भेट देत तेथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एनआरआय कॉम्प्लेक्स ही नवी मुंबई क्षेत्रातील अतिशय मोठी सोसायटी असून येथील फेज 2 मध्ये 500 कि.ग्रॅ. क्षमतेची कंपोस्ट पीट्स बनविण्यात आली आहेत. सोसायटीमधून दररोज संकलीत होणारा ओला कचरा पीट्समध्ये टाकला जात असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. दररोजच्या सरासरी 400 कि. ग्रॅ. ओल्या कचर्‍यापासून निर्माण होणारे खत सोसायटीच्या आवारातील उद्यान व हिरवाई विकसित करण्यासाठी वापरले जात असून त्यामुळे कचर्‍याची निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते व कचरा वाहतूक खर्चात बचत होते.

रहिवाश्यांसोबतही संवाद
ओल्या कचर्‍यापासून होणार्‍या खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आयुक्त महोदयांनी समजून घेतली व सोसायटीमध्ये दैनंदिन निर्माण होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍याचे तपशील तपासले. सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधून कचरा वर्गीकरण व कचर्‍याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच लावण्याचे अत्यंत चांगले काम आपण करीत आहात, अशी प्रशंसा केली. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने हे सातत्य आपण असेच टिकवून ठेवावे, असे आवाहन आयुक्तांनी या वेळी रहिवाशांना केले.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply