Breaking News

कोरोनामुळे खांदेश्वरचे देऊळ बंद; सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट

कळंबोली ः प्रतिनिधी

श्रावण महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे श्रावणी सोमवारी शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरासमोर रांगा लागतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहेत. त्यामुळे यंदा भाविकांना घरच्या घरीच श्रावण मास साजरा करावा लागणार आहे.

भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यात धार्मिक विधी व व्रतवैकल्ये केल्यास अधिक लाभ होतो, अशी धारणा आहे. दरवर्षी यानिमित्ताने खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिर, कळंबोली सेक्टर 3 येथील सिटी रुग्णालयाजवळील महादेव मंदिर, कामोठे सेक्टर 15 येथील शंकर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात, तसेच या परिसरात यात्राही भरवली जाते. खांदा वसाहतीत खांदेश्वर मंदिरात या श्रावण महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील भाविक गर्दी करतात. दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात प्रवेश मिळवला जातो, परंतु यंदा कोरोनामुळे चार महिन्यांपासूनच सर्व देवळे बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने श्रावण मास काळातही ही मंदिरे बंद राहणार आहेत. त्यामुळे गेल्या 62 वर्षांपासून पारंपरिक चालत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात खंड पडणार आहे. खांदेश्वर महादेव मंदिर चार महिन्यांपासून कुलूपबंद आहे. सकाळी आणि संध्याकाळी पुजार्‍यांच्या हस्ते पूजाअर्चा केली जाते. सोमवारी मंदिराची साफसफाई करण्यात आली, तर संपूर्ण परिसर पाण्याने धुण्यात आला.

-अनेकांचा रोजगार बुडाला

श्रावण मासात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात महादेव मंदिरात भाविकांकडून गर्दी केली जाते. या परिसरात नारळविक्री करणारे तसेच बेलपत्र, फुलांचे हार, अभिषेकासाठी लागणारे भटजी बुवा यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, मात्र यंदा कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात यात्राही भरवली जाते. या यात्रेत लहान मुलांची खेळणी, फुगेवाले, विविध साहित्याची विक्री केली जाते. या यात्रेतून हजारो रुपयांची उलाढाल होत असते. तिलाही आता कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातून भाविक येतात. यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे आणि श्रावण मासातही गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंदच राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन खांदेश्वर महादेव मंदिर स्ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply