विधात्या… तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस, पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी सोडून देत मुलगा फरार झाल्यावर नगरच्या त्या वयोवृध्द पित्याने सप्तशृंगीदेवीला हाच प्रश्न विचारला असणार.
दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी सोडून देत मुलगा फरार झाला. ज्यांनी या जगात आणले, वाढवले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी सप्तशृंगी गडावर जायचे आहे, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगी गडावर आणले आणि त्यांना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वत: तेथून पोबारा केला.हा धक्कादायक प्रकार मंदिर ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचार्यामुळे उघडकीस आला. स्वत:च्या दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला 150 किमी दूर नेऊन एकटेच निराधारपणे सोडून त्याचा पोटचा मुलगा पलायन करतो यावर वरवर विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे.
सप्तशृंगी गडाची पहिली पायरी. दुपारी साधारण तीनची वेळ. नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी. त्याच गर्दीच्या घोळक्यात मळकट-फाटके कपडे नेसलेले, अंगाने बारीक, विस्कटलेले केस अशा वर्णनाचे एक दृष्टिहीन वयोवृद्ध डोळ्यांतून आसवे गाळत बसले होेते. तत्पूर्वी या वयोवृद्धाने काठीचा आधार आणि जागेचा अंदाज घेत सावलीचा आधार शोधला होता. दिवसभर त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नव्हते. रात्री दहाच्या सुमारास गर्दी विरळ झाल्यानंतर हा वृध्द तेथे तशाच अवस्थेत बसून असल्याचे सुरक्षा कर्मचारी पंडित कळमकर यांना दिसले. त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्या वयोवृद्धाने आपले नाव किसन कपालेश्वर वायाळ (65, म्हेसगाव, नगर) असल्याचे सांगितले. ’माझ्या मुलाने मला माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे, असे खोटे सांगून येथे आणले आणि मी परत येईपर्यंत कुठेही न जाण्यास सांगितले. सायंकाळी 4 ते 5 वाजेपासून तो परतलाच नाही. सूनबाईच्या कटकटीला कंटाळून आपला मुलगा येथे मला एकट्याला सोडून निघून गेला,’ अशी आपबिती किसन यांनी सांगितली.
दोन दिवसांपूर्वीच सीबीडी पोलीस ठाण्यातील महिला व मुलांकरिता असलेल्या सहाय्यक कक्षातील सोशल वर्कर आसावरी जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी एप्रिल ते जून महिन्यात ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती दिली. एप्रिल महिना सुरू झाला की सगळ्यांना सुटीचे आणि फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटायला लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये गरीब, श्रीमंत किंवा उच्चशिक्षित असा भेदभाव नाही. सगळीकडे सारखेच. अशा वेळी आम्ही आमच्यापर्यंत आलेल्या व्यक्तींना लागणारी मदत देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मदतीने करीत असल्याचे आसावरी जाधव यांनी सांगितले. यावरून स्पष्ट होते की आजच्या तरुण पिढीला आपले वृध्द आईबाप अडचण वाटू लागले आहेत.
उच्चशिक्षण घेतलेली मुले परदेशात नोकरीनिमित्त जाऊन आली की त्यांना तेथील पाश्चात संस्कृतीचे आकर्षण वाटू लागते. पूर्वी त्याचे प्रमाण कमी असायचे. आता सोशल मीडियामुळे जग जवळ आले. त्यामुळे परदेशात न जाताच तेथील पाश्चात संस्कृतीची माहिती मिळत असल्याने आपल्या स्टेटससाठी त्या पध्दतीने वागण्याचा प्रयत्न तरुण पिढीकडून केला जात आहे. शनिवार-रविवार वीकेंडला फिरायला जाणे. रात्री उशिरापर्यंत जागून पार्ट्या करणे आजच्या तरुण पिढीत स्टेटस समजले जाते. त्यासाठी घरातील ज्येष्ठ नागरिक अडचणीचे ठरू लागल्याने त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसते.
पाश्चात संस्कृतीचे अंधानुकरण करताना ज्या आईवडिलांनी जन्म दिला, कष्ट करून वाढवले आणि आज ज्यांच्यामुळे आपण येथे आहोत त्यांची काळजी घेणे, त्यांना निवारा देणे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांना राहिली नाही हेच खरे. त्यामुळेच आज आपल्याला सगळीकडे ‘नटसम्राट’मधील गणपतराव वास्तवात म्हणताना दिसतात, To be or not to be that is the question. जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे. विधात्या…तू इतका कठोर का झालास?
-नितीन देशमुख (मो. नं. 7875036536)