Breaking News

टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या यशासाठी अंजू जॉर्जने दिले मोदी सरकारला श्रेय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वात उत्तम कामगिरी केली असून एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके पटकाविली होती. या वेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान, भारताची माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने मोदी सरकारच्या काळात नेमका काय बदल झाला सांगत कौतुक केले आहे. सोनी स्पोर्ट्सवरील मुलाखतीत ती बोलत होती.
टोकियो ऑलिम्पिकच्या आधी मोदी सरकारने ज्या प्रकारे खेळाडूंना पाठिंबा दिला त्याचे अंजू बॉबी जॉर्जने कौतुक केले आहे. 2003च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धांमध्येही यश संपादन करणार्‍या माजी ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने आधीच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये नेमका काय फरक आहे यावरही भाष्य केले.
आपले सरकार खेळाडूंना खूप प्राथमिकता देत आहे. पदक जिंकल्यानंतर थेट पंतप्रधान त्यांना फोन करीत आहेत. कोणालाही ही संधी सोडायची नसावी, असे तिने म्हटले आहे. या वेळी तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहभागासंबंधीही सांगितले.
हे पहिल्यांदाच असे होत आहे. आमच्या वेळीही क्रीडामंत्री ऑलिम्पिक विलेजला भेट देत होते. वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन झाले, पण मंत्रालयाकडून काहीही मोठी गोष्ट झाली नाही. हो पंतप्रधानांनी (मनमोहन सिंग) माझे अभिनंदन केले, पण त्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. या वेळी खेळाच्या आधीही पंतप्रधान (नरेंद्र मोदी) खेळाडूंना फोन करीत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत. भारतात काहीतरी मोठे होत आहे. मी ही मजा आणि संधी गमावत आहे, अशी खंत अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केली आहे.
…तर भारत पहिल्या क्रमांकावर
या वेळी किरेन रिजिजू यांच्याकडे क्रीडा खाते नसतानाही ते सक्रीय सहभाग दाखवत असल्यासंबंधी विचारले असता अंजूने सांगितले की, त्यांचा खूप सहभाग असून ते प्रत्येक खेळाडूला ओळखतात. जेव्हा कधी आम्ही मेसेज किंवा फोन करतो तेव्हा ते उपलब्ध असतात, पाठिंबा देण्यासाठी नेहमी तयार असतात. ते नेहमी खेळाडूंना पाठबळ देत असतात. नवे क्रीडा मंत्रीदेखील (अनुराग ठाकूर) क्रीडा पार्श्वभूमी असणारे असून चांगले आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा आम्ही मंत्रालय आणि सिस्टीमकडून अपेक्षित करीत आहोत. त्यामुळे ते आता पदक मिळाल्यानंतर सेलिब्रेट करत आहेत अशातला भाग नाही, ते सुरुवातीपासूनच आहेत. असाच पाठिंबा मिळत राहिला तर भारत पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply