कारवाईसाठी ग्रामस्थाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
रेवदंडा : प्रतिनिधी
बायपास रस्त्यालगत असलेले रेवदंडा ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड बेकायदेशीर असून त्याला परवानगी देणार्या अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी अभिजीत पोईलकर यांनी अलिबाग प्रांताधिकारी आणि रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी घेतलेली जागा (सर्व्हे नंबर 4अ/1/अ/ड) ही खारफुटीची झाडोरा क्षेत्र आहे, तसेच ते सीआरझेड क्षेत्र असून ऑकोलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या अखत्यारीत आहे. कांदळवनाची तोड करून तेथील जागेचा डम्पिंग ग्राऊंडसाठी वापर करण्यात येत असून ही बाब पुर्णपणे चुकीची आहे. या डम्पिंग ग्राऊंडनजीकच पुरातन ग्रामदैवत व इतिहासकालीन भुईकोट किल्ला आहे डम्पिंग ग्राऊंडमुळे किल्ल्याची नासधूस तसेच पडझड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडला परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. या डम्पिंग ग्राऊंडला स्थानिक मच्छीमार बांधव व रहिवाशी यांचा विरोध आहे. येथून रेवदंडा बायपास मार्ग जातो. या मार्गावर स्थानिक मच्छीमार बांधव दिवस-रात्र जा-ये करत असतात. येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे मच्छीमार व स्थानिक रहिवाशी बांधवांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागेल, असेही या निवेदनात नमूद केले आहे. रेवदंडा ग्रामपंचायत, ग्रामसेवक तसेच अलिबाग पंचायत समिती याच्याकडे या डम्पिंग ग्राऊंडबाबत चौकशी केली असता, योग्य उत्तरे दिली जात नाहीत, असे अभिजीत पोईलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
डम्पिंग ग्राऊंडची जागा रेवदंडा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असून, तेथे कोणत्याही प्रकारचे कांदळवन नव्हते. कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तेथे घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडचा त्रास कोणासही होणार नाही. शिवाय डम्पिंग ग्राऊंडला कंम्पाउंड करण्यात येणार आहे. कचराची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड होणे गरजेचे आहे.
-मनिषा चुनेकर, सरपंच, रेवदंडा ग्रामपंचायत