Breaking News

एक होती इर्शाळवाडी!

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्‍या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्‍याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…!
मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर जाणार्‍या गिर्यारोहकांसाठी ही आदिवासीवाडी आधीपासूनच परिचयाची. त्यांच्या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे भटकंती करण्यासाठी जाणारी मंडळी आवर्जून तिथे काही काळ विसावा घेऊन पुढे चढाई करतात. साहजिकच स्थानिक ग्रामस्थांचा शेतीखेरिज पर्यटन व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो. दमलेल्या पांथस्थांना खाणे-पिणे देऊन त्यांचा थकवा दूर करण्याचे काम आदिवासी लोक आवडीने करीत. आता मात्र तेथील उरलेल्या ग्रामस्थांनाच आधार देण्याची वेळ आली आहे.
इर्शाळवाडीसाठी बुधवारचा दिवस नेहमीसारखा होता. दिवसभर काबाडकष्ट करून गावकरी रात्री निद्रेच्या अधीन झालेले असताना 11च्या सुमारास अचानक डोंगराचा भाग वाडीवर कोसळला. खालच्या बाजूला असलेल्या शाळेत या वाडीवरील काही मुले झोपायला गेली असताना त्यांना मोठा आवाज ऐकायला आला. काय झाले म्हणून ते पहायला गेले असता भयंकर घटना घडल्याचे दिसले. याबाबत पायथ्याशी जाऊन सांगण्याशिवाय त्यांच्या हाती काही उरले नव्हते. सुमारे 48 घरे आणि 220 लोकवस्ती असलेल्या इर्शाळवाडीतून कामानिमित्त बाहेरगावी गेलेले लोक, शिक्षणासाठी अन्यत्र असलेले विद्यार्थी, वाडीतील शाळेत झोपायला गेलेली मुले, मासे व खेकडे पकडण्यासाठी बाहेर पडलेले लोक आणि प्रसंगावधान राखून बाहेर पडलेले ग्रामस्थ वगळता सारे जण ढिगार्‍याखाली दबले गेले. जशी माळीण आणि तळीयेची घटना मन सुन्न करणारी होती, तशीच इर्शाळवाडीतील निःशब्द करणारी आहे.
दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना हातात हात घालून कार्यरत आहेत. ढिगार्‍याखाली जे कुणी जिवंत आहेत त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले जात आहे, तर मयतांचे शव बाहेर काढून मूठमाती दिली जात आहे. उंचावरील भौगोलिक स्थान, सततचा पाऊस, धुके बचावकार्यात अडथळा निर्माण करीत आहे. तरीही सगळ्या समस्यांवर मात करून मदतीचे हात झटत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायवाटेने चढून जाऊन घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपद्ग्रस्तांना धीर दिला. तत्पूर्वी रात्रीच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्यासमवेत इर्शाळवाडीत पोहचले होते. पनवेलचे संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूरही सकाळी दाखल झाले. त्यानंतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी तेथे जाऊन पाहणी करून आढावा घेत आहेत.
इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे 2005 साली रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यात असलेल्या दासगावसह जुई, कोंडिवते व रोहन गावात दरडी कोसळून एकूण 194 जणांचा मृत्यू झाला होता. 2014मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण गाव दरडीखाली जमीनदोस्त होऊन 151 लोकांचा बळी गेला. दोन वर्षांपूर्वी रायगडातील महाडमधील तळीये गावावरही काळाने असाच घाला घातला. यात 87 जण मृत्युमुखी पडले होते. त्याचवेळी शेजारील पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी आणि केवनाळे येथे दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले.
अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खरंतर पावसाळ्यापूर्वी दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असतो, मात्र अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. नुकतीच दुर्घटना घडलेली इर्शाळवाडी दरडप्रवण क्षेत्रात नव्हती. तरीही तेथे नैसर्गिक संकट ओढावले. याची कारणे तज्ज्ञ सांगू शकतील. एवढे मात्र नक्की की डोंगरभागात राहणार्‍यांनी इतरत्र स्थलांतरित होणे काळाची गरज आहे. बर्‍याचदा लोक आपण राहत असलेली जागा सोडण्यास तयार होत नाही, कारण त्यांच्या भावना तेथे जोडल्या गेलेल्या असतात, पण मरणापेक्षा स्थलांतर केव्हाही चांगले. किमान पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये तरी सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रबोधन आणि व्यवस्था व्हायला हवी, जेणेकरून अशी मनुष्यहानी टाळता येईल.
-समाधान पाटील, पनवेल

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply