Breaking News

विराटसेना ठरली सरस!

टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजांनंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक मार्‍याने लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह (1/5) , शार्दूल ठाकूर (2/19), वॉशिंग्टन सुंदर (2/37) आणि नवदीप सैनी (3/28) यांनी टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु त्यातही विराटसेना सरस ठरली.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन (52) आणि लोकेश राहुल (54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली, पण आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. कर्णधार विराट कोहलीने (26) सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची (31*) चांगली साथ मिळाली आणि टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. भारताने अखेरच्या चार षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शार्दूल ठाकूरने 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला 200 धावांचा पल्ला पार करून दिला. भारताने 20 षटकांत 6 बाद 201 धावा केल्या.
 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे चार फलंदाज 26 धावांत माघारी परतले होते. अँजेलो मॅथ्यूज (31) व धनंजया डी सिल्वा (57) यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना श्रीलंकेच्या आशा जिवंत राखल्या, पण लंकेचा संपूर्ण संघ 123 धावांत माघारी परतला व टीम इंडियाने 78 धावांनी सामना जिंकला. भारताची तीन टी-20 सामन्यांची 15वी मालिका आहे. त्यापैकी टीम इंडियाने 13 मालिका जिंकल्या आहेत, तर एक मालिका गमावली आणि एक अनिर्णीत राहिली. टी-20 क्रिकेटमधील भारताचा हा धावांच्या बाबतीत पाचवा सर्वांत मोठा विजय ठरला.
 या विजयासह टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 13 विजयांचा विक्रम टीम इंडियाने शुक्रवारी केला. पाकिस्तान संघानेही श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध प्रत्येकी 13 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकले, पण टीम इंडियाने 19पैकी 13 सामने जिंकून सरस कामगिरी केली. पाकिस्तानला 21 सामन्यांत हा विक्रम करता आला होता.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply