स्थानिक शाळा, सामाजिक हॉलमध्ये व्यवस्था
पेण ः प्रतिनिधी
इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनही सावध झाले आणि प्रत्येक तालुक्यातील दरडप्रवण भागाचा अहवाल घेऊन त्वरित लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. पेण तालुक्यात 10 ते 12 गावांतील मिळून 177 कुटूंबातील 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर त्या त्या गावातील शाळेत व मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आले असून प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.
गेल्या आठवडाभर पडणार्या मुसळधार पावसामुळे चांदेपट्टी या डोंगरावर असणार्या गावात जमिनीला भेगा पडल्या. यामुळे येथे दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या भागातील एकुण 23 कुटुंबीयांच्या 35 नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
खरोशी व दूरशेत या गावांमध्ये दरड कोसळून चार ते पाच घरांमध्ये चिखल, माती आली होती. यामुळे येथील पाच कुटूंबातील 20 जणांचे स्थलांतर दरशेत येथील राजिपच्या शाळेत करण्यात आले आहे, तर खरोशी येथील 108 कुटुंबातील 461 नागरीक रात्रीच्यावेळी आपापल्या नातेवाईकांकडे जातात.
त्याचबरोबर तरणखोप हद्दीतील बारीवाडी आदिवासीवाडीतील 29 कुटुंबातील 111 नागरिकांचे मराठा समाज हॉल, आंबेघर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील इंद्रनगर, नवेगाव येथे ही दरड कोसळण्याचा धोका संभवत असल्यामुळे 30 कुटुंबातील 43 नागरिकांचे वडखळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, तसेच तांबडी आदिवासी वाडी, धनगर वाडी, देवळी, जुई अब्बास, शिह आदिवासी वाडी, बोरगांव, कोंडवी, अंतोरे येथील गावातीलही संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांचे त्या-त्या गावातील शाळेत स्थलांतर करण्यात आले आहेत.
असे केले स्थलांतर
महलमिया-चांदेपट्टी भागातील डोंगराळ भागातील कुटुंबियांचे पेण प्रशासनाने शहराकडे स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत गावे, कुटूंब व लोकसंख्येमध्ये महलमिया डोंगर, चांदेपट्टी कुटूंब 23 लोकसंख्या 35, दूरशेत कुटूंब पाच, गांधे, शिहू आदिवासी वाडी कुटूंब पाच लोकसंख्या 29, इंद्रनगर, नवेगाव कुटूंब 30 लोकसंख्या 43, बोरगाव, कोंढवी, अंतोरे, दूरशेत कुटूंब पाच, तांबडी आदिवासीवाडी कुटूंब नऊ, धनगरवाडी, वरवणे, शिंगले वाडी कुटूंब 30, देवळी, जुई अब्बास कुटूंब 13 नातेवाईकांकडे, तरणखोप, बारीवाडी कुटूंब 29 अशी स्थलांतरित केलेल्या नागरिकांची संख्या आहे.