मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस चाललेल्या इंडिया आघाडीच्या गंमतजंमत बैठकीला राज्यातील सत्ताधारी महायुतीने मुंबईतच रणनीती ठरवणारी बैठक घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्का-मोदीजीच’ असे ठणकावून सांगताना ‘त्यांचा उमेदवार कोण’ असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. साधा ‘लोगो’ ज्या इंडिया आघाडीला एकमताने ठरवता येत नाही, ते एकजुटीने रणनीती कशी आखणार?
आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नसली तरी गेले दोन दिवस मुंबईतील राजकीय वातावरण मात्र ही निवडणूक जणु काही अगदी समीप आल्यासारखे तापले होते. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी जंग जंग पछाडत याला-त्याला गोळा करीत कशीबशी मोट बांधलेल्या ‘इंडिया आघाडी’ नामक कडबोळ्याला अद्यापही काही आकार आल्याचे दोन दिवसांच्या बैठकीअखेरीस दिसले नाही. तपास यंत्रणांच्या ससेमिर्याने सैरभैर झालेल्या, पण आपली सत्तालोलुपता झाकण्यासाठी लोकशाही रक्षणाची आवई उठवणार्या लहानमोठ्या 28 पक्षांचे 63 नेते इंडियानामक आघाडीच्या बैठकीसाठी एकत्र आले खरे, पण त्यांच्या या बैठकीतून भोजनावळीखेरीज साध्य काय झाले हे मात्र कळू शकले नाही. जाहीर केल्याप्रमाणे आपला साधा ‘लोगो’देखील या आघाडीला एकमताने लोकांसमोर आणता आला नाही. निव्वळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आरोप करण्याचे काम तेवढे एकजुटीचे प्रदर्शन मांडणार्या या नेतेमंडळींनी केलेले दिसले. त्यांच्या या सावळ्यागोंधळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सवाल करून नेमके बोट ठेवले. ‘आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्का आहे-मोदीजीच’! त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, असा सवाल फडणवीस यांनी केला. एकजुटीच्या प्रदर्शनाकडे मनोरंजनासारखे पाहणार्या जनतेच्या मनातीलच हा सवाल आहे. ‘इंडिया’तील कुणी म्हणते केजरीवाल, कुणी म्हणते ममता बॅनर्जी, पण राहुल गांधी यांचे नाव कुणीही घेत नाही, ते स्वत:ही स्वत:चे नाव घ्यायला तयार नाहीत ही फडणवीस यांची टिप्पणी हशा पिकवून गेली. मुंबईच्या विकासाचे निर्णय आता केंद्र सरकार घेणार का असा सवाल करीत सत्ताधार्यांना घेरणार्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चांगलेच सुनावले. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही, असे ठणकावून सांगत ही निव्वळ जनतेची दिशाभूल आहे असे अजित पवार म्हणाले. या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. इंडिया आघाडीच्या बैठकीला शह देण्यासाठी महायुतीची ही बैठक आयोजित करण्यात आली असा उल्लेख काही माध्यमांतून झाला असला तरी तसे नसून ही बैठक पूर्वनियोजित असल्याचेही महायुतीच्या नेत्यांनी सांगितले. अनेक प्रादेशिक पक्षांची नेतेमंडळीही महायुतीच्या बैठकीला उपस्थित होती. दुसरीकडे तीन पंचतारांकित बैठकांमधून आपापसातील मतभेद मिटवल्याचा आव आणणार्या इंडिया आघाडीला सर्वपक्षांना मान्य असा समन्वयकसुद्धा अद्याप ठरवता आलेला नाही. त्यांच्या समन्वय समितीमध्येदेखील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे एकमेव ज्येष्ठ नेते दिसत आहेत. बाकीची नावे दुय्यम नेत्यांचीच आहेत. अत्यंत कृत्रिम रीतीने एकत्र आलेल्या या आघाडीच्या घटकपक्षांमध्ये सुसंवाद होणार कसा हा एक मोठा प्रश्नच आहे. मोदीविरोधाच्या द्वेष भावनेने एकत्र आलेली इंडिया आघाडी अद्यापही आपली एकजूट चाचपडत शोधत असताना विकासाच्या मुद्द्याने या कडबोळ्याला प्रत्युत्तर देण्यास महायुती पुरती सज्ज आहे.