जि.प. सीईओ डॉ. बास्टेवाड यांनी जाणून घेतल्या समस्या
पोलादपूर ः प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील 2021च्या दरडग्रस्त केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पाहणी दौरा केला.
सीईओ डॉ. बास्टेवाड यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राऊत, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, महाडचे उपअभियंता देशमुख, पोलादपूरचे कांबळे, सहायक गटविकास अधिकारी हंबीर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी जि.प. सदस्य तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य चंद्रकांत कळंबे, देवळे सरपंच पती अनिल दळवी, साखरच्या ग्रामसेविका भोसले तसेच अन्य मान्यवरांनी देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे आणि बोरज-साखर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथील दरडग्रस्त लोकवस्तीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेरवाड यांना माहिती दिली.
महाड तालुक्यातील तळीये येथील दरडग्रस्तांना नवीन घरकुले बांधून राहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत, मात्र, पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि सुतारवाडीतील दरडग्रस्तांना अद्याप घरकुले बांधून देण्यात आली नाहीत. ती बांधून देण्यात यावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.