Breaking News

अशा ‘उडत्या तबकड्या’ प्रत्येक काळात असतात नि विझतातही…

एक सोपा प्रश्न विचारतो, उर्फी जावेद म्हटल्यावर तिची भूमिका असलेला एक तरी चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतो का? (ती चित्रपटात भूमिका साकारते का? का साकारते? हेही उपप्रश्न आहेतच.) एखाद्या मॉलमध्ये ती चक्क समोर आली काय नि गेली काय, तुम्ही ओळखाल? मी नक्कीच नाही. आणि ओळखलं तरी तिच्यासोबत सेल्फी काढावासा वाटेल?
फार नाही आणखी दोन तीन वर्षातच एखाद्या कोड्यामध्ये तुम्हाला आपल्या धाडसी, विचित्र, अनाकलनीय वस्त्ररचना, बेधडक बोलणं, अरेरावी कृत आणि मीडियाचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री कोण असं विचारलं तर कदाचित डोक्याला शॉट नि मेंदूला ताण द्यावा लागेल आणि थोड्या वेळाने कदाचित नाव आठवलेच तर आठवेल उर्फी जावेद. तरी पुन्हा एकदा स्वतःलाच प्रश्न कराल, उर्फी जावेदच होती ना ती? अशा प्रकारच्या अभिनेत्री….खरं अभिनेत्री का म्हणावं हा प्रश्नच आहे म्हणा… कोणी त्यांना ’उडती तबकडी’ म्हणतात. पण प्रत्येक युगामध्ये असतातच. हाही एक फ्लॅशबॅक. सिनेमाचा इतिहास. मनोरंजनाच्या विश्वामध्ये अनेक प्रकारचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक, वितरक, तंत्रज्ञ, अगदी ’पिक्चर्स दाखवणारी थिएटर्सही’ वगैरे वगैरे वगैरे कार्यरत असतात. त्यात हे कल्चर. त्यांना कोणी पीनअप गर्ल्स, ’पानपुरके ’ असंही म्हणतात. काहीही म्हटलं तरी फॉर्मुल्यात आणि फॉरमॅटमध्ये फरक तो नाही. नाव वेगळं असेल इतकंच. तेवढीच ज्ञानात भर. सगळेच कलाकार हे काही दर्जेदार अभिनय करण्यासाठी ओळखले जातात अथवा जाऊ शकतात असे नाही. ते शक्यही नाही. सर्वच चित्रपट अभिनयाला वाव भाव देणारे असतात असेही नाही. तेही शक्य नाही. काही काही कलाकारांना आपल्या अभिनयाच्या मर्यादा, संवाद फेकीतील दोष, उच्चारातील उणिवा, भावनारहित चेहरा याची पूर्ण जाणीव असते (स्वतःच्या मर्यादा माहित असणे सगळ्यात मोठा चांगला गुण) आणि मग असे कलाकार आपल्याकडे चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक, आणि प्रसार माध्यम यांचं लक्ष वेधण्यासाठी सतत सवंगपणाचा मार्ग स्वीकारतात. अर्थात ते आपल्या मर्यादेत राहून अशा प्रकारचा एक वेगळा मार्ग स्वीकारुन आपली वाटचाल करु पाहतात. दोन तीन वर्षातच त्यांचा कारकीर्द उताराला लागते. त्याचीही त्यांना कल्पना असावी. फार पूर्वी त्यांना मीडिया स्टार अथवा ’टाईमपास आर्टिस्ट म्हणायचे. या वर्गात उत्तीर्ण झालेल्या अभिनेत्रींची तुम्हाला मी नाव सांगितली तर कदाचित आश्चर्य वाटेल. या नावाच्या अभिनेत्री कधी काळी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खरंच कार्यरत होत्या का असा कोड्यात पडणारा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तुम्ही लगेचच गुगलवर जाऊन त्यांचा शोध घ्यायला सुरुवात कराल. तेवढाच एक पुरावा सापडेल. शामली, शीतल, पद्मिनी कपिला, के. टी. मिर्झा, कोमिला विर्क, रिंकू जयस्वाल अशी भली मोठी ’हिट लिस्ट’ आहे आणि या अभिनेत्रींने प्रामुख्याने काय केलं तर गॉसिप्स मॅगझिनमधलं सेंट्रल स्प्रेड अथवा त्यातील बोल्ड फोटोसेशन यांना प्राधान्य दिलं. बिकीनी कॅलेंडरमधून दिसत राहिल्या. आपल्या आकर्षक शरीरसौष्ठवाचं ’शक्य तितकं नि तसं उघडं दर्शन प्रदर्शन घडवलं’. त्याची जणू हौस मौज. सवय. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियात हे सगळचं ’झिरपलयं’ म्हणे. ’कॉमन’ झाले आहे. ओटीटीवरील वेबसिरिजमध्ये अनसेन्सॉर्ड अनकट फंडा भारीच आहे म्हणे. इतकेच नव्हे तर, ओटीटीवरील कन्टेनवर महाराष्ट्रीयन अभिनेत्रींनी जरा जास्तच बोल्डपणा दाखवल्याची सोशल मिडियात रंगतदार चर्चा आहे. ते वाह्यात वा सवंग नको. ते थीमनुसार असावे आणि त्यात स्टाईल असेल तर त्याचं कौतुक होईलही. एकेकाळी हेलनच्या ड्रेससेवरून भुवया उंचावल्या जात, पण त्यात आक्षेपार्ह काहीच नसे. आपला फिटनेस, लूक यात तिचा पाश्चात्य कल्चरचा ड्रेस सेन्स छान आकर्षक दिसे. तेच महत्वाचे आहे. सुरुवातीच्या काळातील रेखा म्हणजे पटाकाच. बोल्ड फोटो सेशन आणि बेधडक मुलाखती म्हणजे रेखा हे घट्ट नाते होते. आंबटशौकीनांना भारीच पर्वणी होती. वाटलं होतं, याच ’गरम मसाला’ वैशिष्ट्यात रेखा अडकणार. त्यातून ती अशी नि इतकी बाहेर पडलीय की पन्नासपेक्षा जास्त वर्षांची करिअर असूनही ती आजही कुठेही गेली अथवा असली तरी ’केन्द्रस्थानी’ असते. तिला ते सुखावणारे आहे. आपल्या अभिनयातील वाढ तिच्या कर्तृत्वाची उत्तम वाढ ठरलीय. टिच्चून टिकून राह्यचं तर गुणवत्ता हवीच हवी. नुसतेच अंग नको तर अभिनयाचे अंग हवे. झीनत अमान, परवीन बाबी यांनीही ’पाश्चात्य स्टाईल मे रहेनेका फंडा’ आपल्या पर्सनॅलिटीचा महत्वाचा भाग मानले. त्यांनीही बोल्ड लूक भूमिका व फोटो सेशन केली.पण सवंग झाल्या नाहीत. सत्तरच्या दशकात गॉसिप्स मॅगझिनचा हुकमी फंडा होता, बोल्ड फोटोसेशन आणि बेधडक मुलाखती, त्यांची सणसणीत हेडिंग्ज आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल किंवा साठा जाहीरा, आशा सचदेव, फरियाल अशा ’स्फोटक’ अभिनेत्रींकडून वेळोवेळी मिळत गेला. दरम्यान, इंग्लिशमधलं हे मटेरियल काही दिवसांतच अन्यभाषिक मिडियात पाझरत गेलं तरी त्याच्यावर टीकेचे प्रहार होत. ही अमेरिका नाही, हे युरोप नाही. ही आपली संस्कृती नाही. असे सल्ले दिले जात. नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णीनचे टॉपलेस फोटो सेशन, पूजा भट्टची बॉडी रंगसंगती याचा भारीच कल्चरल धक्का बसला. मिडियात केवढा ओरडा झाला. काही वृत्तपत्रातून वाचकांची पत्रे, अग्रलेख लिहिले गेले. थीमनुसार बोल्ड दृश्य समजू शकतो. ती सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलीत. गॉसिप्स मॅगझिनचं तसं नाही. त्यांना विक्री मूल्य महत्वाचे. वाचण्यासारखे काही नसेल तर ’दाखवण्यासारखं’ काही असावं असा दृष्टीकोन आता होते. आणि एकदा ’पब्लिक फिगर’ झाल्यावर उलटसुलट टीका स्वीकारायची मानसिकता ठेवावी लागतेच. तरीसुद्धा कधी चक्क आश्चर्याचे धक्के बसतात. अलिखित नियमालाही अपवाद असू शकतो. शीतल नावाच्या अभिनेत्रीला ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसालमध्ये अमिताभ बच्चन बरोबर काही चांगले नाट्यमय प्रसंग साकारायला मिळाले. इतकंच नव्हे तर शीतलने निर्माण केलेल्या हनी नावाच्या चित्रपटाची चक्क राज कपूरने तारीफ केली. राज कपूरचे प्रमाणपत्र एकाद्या पुरस्काराइतकचं महत्वाचे. राज कपूरनेच रिना रॉयला त्या काळातील सर्वात मोहक अभिनेत्री असे प्रमाणपत्र दिले आणि रिना रॉयच्या चाहत्यांत वाढ झाली.
असे आश्चर्याचे धक्के पचवणं आहे सोपं नाहीये. आशा सचदेवने बासू चटर्जी दिग्दर्शित प्रियतमा मध्ये आपल्या वाटेला आलेली भूमिका अतिशय उत्तमपणे साकारत समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. असं अधूनमधून घडतच असते. घडायलाच हवे. तरी त्यांची मुख्य ओळख ग्लॉसी पेपरवरील आपल्या शरीर सौंदर्याचं नवीन फॅशनच्या वस्त्रांमधून दर्शन प्रदर्शन घडवून सनसनाटी निर्माण करणं हेच असतं. तीच परंपरा अनिता अयूबपासून शरलीन चोप्रापर्यंत अनेकींनी सुरु ठेवली. काय करणार? तेच येत होतं. ऐवीतेवी सी ग्रेड पिक्चर्सही पडद्यावर येत असतात. व्हिडिओ थिएटरमधून पाहिले जात असतात. त्यांना प्रतिष्ठा जरी नसली तरी प्रसिद्धी मात्र आहे. सोशल मीडियाच्या काळामध्ये तर अशा पद्धतीचं ढिंच्याक फोटोसेशन आणि बेधडक व्यक्तव्य यांना मोठाच प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. आपणच आपले फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियामध्ये पोस्ट करायचे. मिताली मयेकरही बिकीनीतील फोटो सोशल मिडियात पोस्ट करते आणि ट्रोलर्सना उत्तरही देते. मराठीतील स्मिता गोंदकर, सई ताम्हणकर, छोटी सोनाली कुलकर्णी यांनीही बिकीनीत पडद्यावर वा सोशल मिडियात दर्शन घडवले. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या, पण त्यात आकर्षकता होती. प्रार्थना बेहेरेचे स्वीमिंग पूलावरचे बेदिंग सूटातील फोटोसेशन ब्युटीफुल याच शब्दात कौतुक करण्यासारखं. दुसरीकडे पाहिलं न पाहिलं तरी सोशल मिडियाच्या काळात उर्फी जावेद पठडीतल्या चेहर्‍यांची वाढ झाली आहे आणि त्यांना कुठे हो चित्रपट माध्यम व व्यवसायाविषयी फार काही देणं घेणं आहे? त्यांना तेवढापुरता एक टाईमपास नि झटपट प्रसिद्धी हवी. त्यांना पेज थ्री पार्ट्यांतून ’आईस कॅन्डी’ (लक्ष वेधून घेणार्‍या अशा अर्थाने) म्हणून फिरायचेय. रेड कार्पेटवर त्यांना लक्ष वेधून घ्यायचयं. इतकंच नव्हे तर आता विमानतळावरच्या फोटो सेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही अभिनेत्री आपला जलवा दाखवतात.. त्यातील एक्सपोजर आणि फोकस यांचा जो संगम आहे त्याच्यासाठी अतिशय पूरक असं वातावरण आहे. अनेकांची नावे लक्षात येण्यापूर्वीच विसरली जाण्याची सवय झालीय. उर्फीसारख्या सवंग आणि बेधडक, उथळ युवतींचे आज फावलयं. आज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची बातमी होतेय. पीआर टीम त्यासाठी तत्पर आहे. असं असूनही एकदा घात झालाच. एका इव्हेन्टसमध्ये दीपिका पदुकोण एका फॅशनेबल रुपात गेली आणि नेमक्या त्यावरून ट्रोल झाली. ती तिला तिच्या पीआर टीमने टीप्स दिली होती म्हणे. हे सेलिब्रिटीजच्या आजूबाजूचे देत असलेले सल्ले खरंच उपयुक्त आहेत ना याचाही विचार करावा. एका विषयाला फाटे तरी किती फुटताहेत बघा. आज अभिनयापेक्षा दिसण्याला जास्त महत्व आलयं. सांस्कृतिक क्षेत्रातील मोकळ्या ढाकळ्या वातावरणाचाही परिणाम असावा..आजच्या चित्रपटांमध्ये भूमिका करायची म्हणजे आता मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, तनुजा, नूतन, आशा पारेख, सायरा बानू, माला सिन्हा यांचा काळ राहिलेला नसला अथवा हेमा मालिनी, रेखा, राखी, जया भादुरी, नीतू सिंग, पद्मिनी कोल्हापूरे, पूनम धिल्लॉन, शबाना आझमी, स्मिता पाटील यांचं युग नसले, श्रीदेवी, जयाप्रदा, डिंपल कापडिया, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्री, जूही चावला, मनिषा कोईराला, रति अग्निहोत्री यांचा काळ सुद्धा मागे पडला असेल, परंतु या अभिनेत्रींनी आपला अभिनय, नृत्य, सौंदर्य आणि अनेक प्रकारच्या अनुभवातून येत गेलेली परिपक्वता आणि या सगळ्यातून आलेलं सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम यांचं भान यातून जे आपलं स्थान निर्माण केलं आणि टिकवलं याला दाद द्यायलाच हवी. चित्रपटांमध्ये काम भूमिका करायची म्हणजे फक्त सौंदर्याचं नाणं उपयुक्त नसते. ’छान दिसलो, छान हसलो, छान सजलो’ झालो आपण अभिनेत्री असं आणि इतकं सोपं समीकरण आहे का? अभिनय व नृत्याचे प्रशिक्षणही महत्वाचे आणि काम करता करता अभिनयात परिपक्वताही महत्त्वाची. गुणवत्तेशिवाय कोणीही कोणत्याच कुठल्याही क्षेत्रांत आपलं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. नाणं चलनी करू शकत नाहीत, परंतु ती अवघड वाट स्वीकारण्यापेक्षा शॉर्टकटने जर प्रसिद्धी मिळणार असेल नि फोकसमध्ये राहता येत असेल तर त्यासाठी शॉर्ट कपडे आणि स्फोटक बोलणं ही आयुध अथवा शस्त्रे उपयोगी पडत असतील तर त्याचा आपण वापर करावा अशा मानसिकतेचासुद्धा एक वर्ग या मनोरंजन क्षेत्रांमध्ये कालही होता, आजही आहे आणि यापुढे देखील राहील. अर्थात बिकिनी परिधान करणं याकडे नेहमीच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आहे. दिल्ली का ढगसाठी नूतनने बेदिंग सूट परिणाम केला त्यावेळी तो एक सांस्कृतिक धक्का मानला गेला. कारण आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि भावमुद्रांनी अभिनयाचा वेगळा अविष्कार साकारणार्‍या नूतनला अशा पद्धतीने बेदिंग सीट परिधान करण्याची का आवश्यकता भासली असा एक रोखठोक सवाल होता, परंतु थीम आणि प्रसंगाची गरज म्हणून आपण अशा वस्त्राला पसंती दिली याकडे नूतनने लक्ष वेधून घेतले. शर्मिला टागोरने अशाच बेदींग सुटामध्ये एका ख्यातनाम चित्रपट मासिकाच्या कव्हरवर दर्शन घडवलं तेव्हाही फार मोठी खळबळ उडाली, परंतु ते फोटोसेशन म्हणजेच आपण नव्हे तर आपण सत्यकाम, आराधना, ’अमर प्रेम सारख्या चित्रपटांमधून पुन्हा पारंपारिक स्त्रीची भूमिका साकारुन एक आदर्श निर्माण करू शकतो हे शर्मिला टागोरने सिद्ध केलं. शक्ती सामंता दिग्दर्शित ’न इव्हिनिंग इन पॅरीस’च्या पूर्वप्रसिध्दीचा फंडा म्हणूनही तो ग्लॅमरस फोटो सेशनचा तडका होता. फारच चघळला गेला हो. सत्तरच्या दशकात अभिनय येत असणार्‍या अभिनेत्री एका एका बाजूला आणि ग्लॅमरला महत्त्व असणार्‍या अभिनेत्री दुसर्‍या बाजूला असे दोन ट्रॅक एकाच वेळी सुरु झाले. जया भादुरी हे पहिल्या प्रकारातील अभिनेत्री म्हणून घडत गेली. मग शबाना आजमी, स्मिता पाटील, दीप्ती नवल यांनी समांतर चित्रपटाची वाटचाल पुढे चालू ठेवली आणि दुसर्‍या बाजूला बघितलं तर रीना रॉय, पुनम धिल्लॉन अशा ग्लॅमरस अभिनेत्रींनी त्या काळात उत्तम वाटचाल केली. नंतरच्या काळात एका बाजूला तब्बूने पारंपारिक भूमिकांकडे लक्ष दिलं. कंगना राणावतने ह्या दोन्हीचा समतोल राखला.. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या परंपरेचा वेध घेताना असे बरेच संदर्भ आणि वैशिष्ट्य सांगता येतील आणि त्यामधला एक फंडा होता शॉर्टकटने यश मिळवण्याचा प्रयत्न करणे. कलेच्या क्षेत्रात शॉट कर्ट नसतात हे त्यांना कोणीतरी सांगा हो. अल्पकाळासाठी का होईना फोकस मध्ये राहणं म्हणजे जणू ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या काळात असल्यासारखं झटपट सवंग प्रसिद्धी मिळवणं आणि ते मिळवताना दुर्दैवाने वस्त्रांचा आणि भाषेचे भान नसणं. एक्सप्रेशन तर नसणेच. नाहक वाद घालणं आणि ह्या सगळ्यातून मिळणारी सणसणीत प्रसिद्धी म्हणजेच आपलं करियर आहे, आपलं अस्तित्व आहे, आपली प्रसिद्धी आहे असं मानणं हे अनेक वर्ष होत आलेलेच आहे. अशा प्रकारच्या अभिनेत्री कालांतराने कालबाह्य कधी होतात हेही समजत नाही. पडद्यावर दिसेनाशा होतात. इव्हेन्टसमधूनही गायब होतात. त्या नेमक्या कुठे जातात, कुठे असतात हे समजत नाही आणि अनेक वर्षांनी अशा एखाद्या अभिनेत्रीच्या कमबॅकची बातमी येते, परंतु त्याबद्दल कोणत्याही प्रकारची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत नाही वस्तुस्थिती आहे मंदाकिनीला आपण अलीकडे एका कॉमेडी रियालिटी शोमध्ये पाहिलं. त्यावेळेला आपल्याला असं अजिबात वाटलं नाही की ही पुन्हा चित्रपटांमध्ये येऊन आपला काही प्रभाव दाखवेल. ही आपली एक निराशाजनक प्रतिक्रिया आहे अथवा आपल्याला अशा अभिनेत्रीबद्दल कुठलाही प्रकारची सत्कारात्मक भावना आपल्या मनात येत नाही याच्यातच बरंच काही आलं. राज कपूरने राम तेरी गंगा मैली मध्ये (1985) मंदाकिनीला ’गंगा’ म्हणून साकारताना राज कपूरचा आपला स्वतःचा एक दिग्दर्शनीय स्पर्श नि दृष्टी होती. त्यामुळे मंदाकिनी त्या एका चित्रपटापुरती आपल्याला लक्षात राहिली. त्या व्यतिरिक्त मंदाकिनी आपलं करिअर घडवणं शक्यच नव्हतं. अशा प्रकारच्या अनेक मंदाकिनी कधी ममता कुलकर्णी नावाने तर कधी उर्फी जावेद नावाने आपल्यासमोर ये जा करत असतात. त्यांच्यात लक्षात ठेवण्यासारखं असे कोणतेही गुण नसतात. भावमुद्रा नसते. फोटोची पोझ नसते किंवा बोलण्यामध्ये एक कुठलाही प्रकारचे गांभीर्य नसतं. अशा टाईमपास मुलींची चित्रपटसृष्टीला अधून मधून गरज असते असे म्हणायला हरकत नाही. कारण ए टू झेड प्रकारचे चित्रपट आपल्याकडे निर्माण होत असतात. एखाद्या चित्रपटामध्ये अशा प्रकारची एखाद्या अभिनेत्रीची गरज लागतेच म्हणा. या चौकटीमध्ये अडकून किंवा हरकून आपलं करिअर संपवण्यापेक्षा त्यातून बाहेर पडून ज्यांना आपली पुढची वाटचाल करणे शक्य झालं असे एखाद्या रेखाबद्दल आपल्याला नेहमीच कौतुक वाटले. असं उदाहरण एकादेच. म्हणून महत्वाचे आणि ते एक उदाहरण इतरांना प्रेरणा देणार ठरू शकते एवढेच आपण सांगू शकतो. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या अभिनेत्रींचा मीडिया स्टार बनण्यापलीकडे काही हेतू नसतो. ही मात्र मोठी रियालिटी आहे. हा एक मोठा शो आहे आणि शो बिजनेसमध्ये अशा प्रकारचं फंडे हे होतच राहणार. ते आपण पाहायचे नि विसरायचे. सोडून द्यायचे हे नक्कीच. आणखीन काही दिवसांनी उर्फी जावेद हे नाव जरी आठवलं तरी तो तिचा एक प्रकारचा विजय ठरले एवढं नक्कीच. तसं नक्कीच होणार नाही याचा पुरेपूर विश्वास आहे हो. तेवढे आपण सुज्ञ नक्कीच आहोत.

– दिलीप ठाकूर चित्रपट समीक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply