हजारो रसिकांनी अनुभवली सुश्राव्य सांगीतिक मेजवानी
पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपावलीचा उदंड उत्साह, प्रभू श्रीराम व अयोध्या मंदिर प्रतिकृतीची शानदार आरास, थंडीचा सुखद गारवा आणि यामध्ये सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला. पनवेल महानगरपालिका आयोजित आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सांगीतिक मेजवानीने दीपावलीचा आनंद द्विगुणित झाला.
यंदा दिवाळी पहाटचे सातवे वर्ष होते. यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर व सहकार्यांनी सुश्राव्य गाण्यांची सुमधूर मैफिल सादर केली. एकाहून एक गीते सादर करीत त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली, तर या सोहळ्याचे निवेदनही तेवढ्याच खुमासदार पद्धतीने अभिजित कुलकर्णी यांनी केले. या वेळी वाद्यवृंदाची साथही तेवढीच ताकदीची होती. अमेय ठाकूर, प्रथम कुलकर्णी, श्री. अनिल, झंकार कानडे, श्री. सागर, सिद्धार्थ कदम यांनी वाद्यवृंदावर साथ दिली.
दीपावली म्हणजे दिव्यांचा, संस्कृतीचा आणि आनंदाचा उत्सव. यानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र विविध आनंदमयी कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. त्यात सुरांच्या आविष्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने सादर झालेल्या ’दिवाळी पहाट’ने वातावरण प्रफुल्लित केले. या वेळी वडाळे तलाव परिसर हजारो श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजला होता. या तलावाच्या सौंदर्याने आणि निर्सगाच्या सानिध्यात झालेल्या मैफिलीने पहाट ते कोवळ्या उन्हाच्या साक्षीने तेजोमय संगीत बहरले. या वेळी आर्या आंबेकर व सहगायक सौरभ यांनी विविध गाणी सादर करून वातावरण संगीतमय केले. गणनायका, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली, विठ्ठला तू वेडा कुंभार, घेत असे जन्मा, कधी रे येशील तू, केव्हा तरी पहाटे, त्या फुलांचा गंध, तुला न कळले, येशील परतून, कितीदा नव्याने तुला आठवावे, केवड्याचे पान तू, हृदयात वाजे समथिंग, मन उधाण वार्याचे आदी अभंग, भक्तीगीते, भावगीते, चित्रपट गाणी, इतर गीते सादर होताना पनवेलकर रसिक प्रेक्षकांनी गायकांना भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमस्थळी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्यक्ष सहा हजारहून अधिक रसिकांनी, तर थेट प्रक्षेपणातूनही हजारो रसिकांनी या संगीत मेजवानीचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, भाजप मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे सहआयुक्त गणेश शेट्ये, माजी महापौर कविता चौतमोल, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, वृषाली वाघमारे, मंदा भगत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, रायगड भूषण उमेश चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय कांडपिळे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, अमोल खेर, अभिषेक भोपी, गणेश जगताप, वैभव बुवा, अक्षय सिंग, आदित्य उपाध्याय यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, संगीत, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.