Breaking News

विश्वविजय एक पावलावर…!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली, तर दुसर्‍या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करीत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. आता रविवारी यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकासाठी निर्णायक संग्राम होईल…
मायदेशी होत असलेल्या एकदिवसीय प्रारूपातील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत अविश्वसनीय कामगिरी केली आहे. साखळी सामन्यांत सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांना नमवून आणि त्यानंतर उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर दुसर्‍यांदा विजय साकारून भारत या स्पर्धेत अपराजित आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघ उभा ठाकला आहे, ज्याला भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात एकतर्फी मात दिली होती.
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिलेला आहे. त्यांनी हॅट्ट्रिकसह सर्वाधिक पाचव्यांदा (1987, 1999, 2003, 2007, 2015) विश्वचषक उंचावलेला आहे. खासकरून रिकी पाँटिंग कर्णधार असताना ’कांगारू’ संघाचा सुवर्णकाळ होता. तेव्हा त्यांना हरवणे अशक्यप्राय मानले जायचे. याच ऑस्ट्रेलियाने 2003च्या विश्वचषकात भारताचा अंतिम फेरीत दारूण पराभव केला होता. पुढे आठ वर्षांनी म्हणजेच 2011मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय मिळवत त्यांच्याविरुद्धची मागील चार विश्वचषक स्पर्धांमधील पराभवाची मालिका खंडित केली.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या सलग दोन सामन्यांत त्यांची हार झाली. नंतर या संघाची गाडी रूळावर आली आणि त्यांनी पुढचे सर्व म्हणजे सात साखळी सामने जिंकले. यातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑसी संघावर पराभवाची नामुष्की ओढवली असती, पण दैव बलवत्तर असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत झुंझार द्विशतकी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यानंतर या संघात जोश संचारला असून विजयी घोडदौड कायम ठेवत त्यांनी उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आफ्रिकेचा संघ यंदाही कमनशिबी ठरला. साखळी सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केल्यानंतर बाद फेरीचा अडथळा मात्र त्यांना पार करता आला नाही. क्रिकेटचे असेच असते ज्या दिवशी जो संघ प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगला खेळतो विजयाची माळ तेव्हा त्याच्या गळ्यात पडते.
भारत यंदाच्या स्पर्धेत अजिंक्य आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत न भुतो न भविष्यति अशी कामगिरी खेळाडूंनी केली आहे. विशेषत: स्टार फलंदाज विराट कोहली जबरदस्त लयीत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रम विराटने याच विश्वचषक स्पर्धेत मोडून शतकांचे अर्धशतक साजरे केले. शिवाय एका विश्वषकातील सर्वाधिक 673 धावांचाही सचिनचा विक्रम मोडून त्याने नवा इतिहास रचला आहे. तडाखेबंद फलंदाज असलेला कर्णधार रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात करून देत असल्याने नंतर येणार्‍या फलंदाजांना खेळपट्टीवर पाय रोवणे सुकर होते. या स्पर्धेत आणखी एका खेळाडूने प्रभावित केले आहे, तो म्हणजे श्रेयस अय्यर. संघर्षपूर्ण वाटचाल करीत श्रेयसने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपली पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला हा युवा खेळाडू दबाव न घेता ज्या पद्धतीने खेळी करतो ती कौतुकास्पद आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटने साकारलेल्या ऐतिहासिक शतकामुळे श्रेयसची शतकी खेळी काहीशी झाकोळली गेली, पण या विजयाचे ’श्रेय’ बर्‍याच प्रमाणात त्याला जाते, कारण त्याने धावगती वाढवली नसती, तर भारताला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नसती आणि मग आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखणे आपल्या गोलंदाजाला अवघड गेले असते. ‘किवीं’नी आपल्याला ऐन थंडीत घाम फोडलाच होता. मोहम्मद शमी नेहमीप्रमाणे धावून आला आणि मग हा विजय आपल्या आवाक्यात आला. या अफलातून गोलंदाजाने वय इच्छाशक्तीच्या आड येऊ शकत नाही हे दाखवून दिले आहे. विश्वचषकात कमी सामने (सहा) खेळून सर्वाधिक 23 गडी बाद करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. याखेरीज इतरही अनेक विक्रम त्याचा नावलौकिक वाढवत आहेत.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाकडेही अनुभवी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, लाबुशेन यांसारखे फलंदाज आणि गोलंदाजीत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झम्पा असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होऊ शकतो.
भारताला यानिमित्ताने 2003च्या अंतिम फेरीतील पराभवाचे उट्टे फेडण्याची नामी संधी आहे. त्याचप्रमाणे एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 11 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्याच (2003, 2007) विश्वविक्रमाची बरोबरी करता येईल. हा दुहेरी योग साधून भारत तिसर्‍यांदा विश्वचषक उंचावणार? की ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा षटकार ठोकणार? याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
-समाधान पाटील, पनवेल

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply