नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा जसप्रीत बुमराह पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवची आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली. निवड समितीने बुमराहच्या जागी यादवला संघात घेतल्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका करण्यात आल्याचे दिसून आले, पण भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने उमेशचे समर्थन केले आहे.
उमेश यादवची निवड कशी योग्य आहे याबाबत आकाश चोप्राने ट्विट केले आहे. ’उमेश यादवच्या निवडीवर टीका करणार्यांनो, घरच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात उमेशने 10 बळी टिपले होते. हैदराबादच्या सपाट खेळपट्टीवर जिथे इतर गोलंदाज ढेपाळले तेथे त्याने ही कामगिरी करून दाखवली होती,’ अशा शब्दांत ट्विटरवर चोप्राने यादवची पाठराखण केली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.