Breaking News

मल्टिप्लेक्सच्या पडद्यावरचं ‘लाईव्ह क्रिकेट’ पैसा वसूल पिक्चर

आजच्या विश्वचषक क्रिकेट अंतिम सामन्याची तिकीटे ऑनलाईन तिकीट बुक करा आणि मल्टिप्लेक्सच्या भल्या मोठ्या पडदाभर आजचा क्रिकेट सामना लाईव्ह एन्जॉय करा ही कल्पना नव्हे; हा तर रियॅलिटी शो आहे. कदाचित स्टेडियमवरचा उत्स्फूर्त फिल गुड येणार नाही, पण फुल्ल वातानुकूलित मल्टिप्लेक्समधील स्क्रीनवर ’हाऊसफुल्ल गर्दी’त प्रत्येक चेंडूवरची घडामोड छान अनुभवता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे आपला भारतीय क्रिकेट संघ त्यात फेवरेट आहे. मग मल्टिप्लेक्सचे महागडे तिकीट बुक करायलाच हवे. तर मग बघूया नेमक्या कोणत्या मल्टिप्लेक्समध्ये क्रिकेटचा लाईव्ह शो आहे ते…
हा आजचाच ’शो’ नाही. देशभरातील अनेक मोठ्या शहरांत यापूर्वीच क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने मल्टिप्लेक्सच्या पडद्यावर दिसले. कधी तर काही ग्रुप्स एकाच ’शो’ची शे दोनशे तिकिटे काढून मल्टिप्लेक्समध्ये मॅच पाहताना धमाल करतात. आजचं क्रिकेट शास्त्रशुद्ध नाही, त्याची गरज वाटत नाही. ते कोणत्याही चौकटीत मावणारं नाही, तर्काच्या कसोटीवर पाह्यचं नाही, हवेत फटके मारणे, स्टेडियममध्ये चेंडू पोहचवणे, हवेतच झेल पकडणे यांचं आहे. ’आजच सामना, आजचं निकाल’ हे तर एकदिवसीय क्रिकेट आणि ट्वेन्टी-ट्वेंन्टी क्रिकेट यांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या ग्लोबल युगातील तरुणाईला हेच हवे आणि ते जर घराबाहेर पडून सोसायटीचं मैदान, गार्डन, गच्ची, मग क्लब, पब, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, फार्म हाऊस असं करता करता मल्टिप्लेक्सच्या पडद्यावरही आले आहे, रंगत आहे तर पाहूयात की डोळे भरभरून. पडदा जेवढा मोठा तेवढा ’सामन्यांत रस’ मोठा. बरं, दोन्हीत स्टार. सेलिब्रिटीज. जगभरातील क्रिकेटच्या मैदानावरचे स्टार सिनेमाच्या पडद्यावर पाहण्यात वेगळीच रंगत.
आता सिनेमाच्या पडद्यावरचे क्रिकेट असं म्हटलं रे म्हटलं की आमिर खान निर्मित व आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’लगान’ (2001)ची अर्थात भुवनच्या (आमिर खान) ग्रामीण संघाची आठवण यायलाच हवी. एकीकडे तो पिरिऑडिकल सिनेमा असतानाच दुसरीकडे त्यात देशभक्तीची भावनाही जागवली आणि दोन्हीला क्रिकेटने छान जोडलंय. कथा, पटकथा, संवाद यावरची मेहनत सिनेमाभर दिसते. पडद्यावरच्या फिल्मी क्रिकेटपासून (देव आनंदने आपल्या दिग्दर्शनातील ’अव्वल नंबर’ या चित्रपटात क्रिकेटंच साकारलंय आणि त्यात आमिर खानही होता. अर्थात, हीरो देव आनंदच. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या मैदानावरच्या या पिक्चरच्या सेटवर आम्हा सिने पत्रकारांना देव आनंदने नेहमीच्या उत्साहाने शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले असता आमिर खानला क्रिकेटची समज जास्त असल्याचे जाणवले. देव आनंद नेहमीप्रमाणेच आपल्याच प्रेमात.) क्रिकेटपटूवरचा चरित्रपट (धोनी द अनटोल्ड स्टोरी अप्रतिम प्रभावी हाताळणीने खिळवून ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊनही मेहनत आणि निष्ठेने यशस्वी क्रिकेटर तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता येते अशी जबरदस्त प्रेरणादायी अशी रियल स्टोरी यात आहे. ’धोनी कसा घडला’ ही एक जबरदस्त अशी आदर्श कथा. म्हणूनच पिक्चर पहिल्याच दृश्यापासून पकड घेतो. तेच तर महत्त्वाचे असते.) अशी उदाहरणे बरीच. ’लव्ह मॅरेज ’चित्रपटात देव आनंदच्या एक नजर मे दिल हो गया एबीडब्ल्यू या गाण्यापासून विजयसिंह पटवर्धन दिग्दर्शित ’कभी अजनबी थे’मध्ये संदीप पाटीलने अभिनयाचा प्रयत्न करण्यापर्यंत सिनेमाच्या पडद्यावरचे क्रिकेट बरेच. अनेकदा पिक्चर फ्लॉप झालाय ते जाऊ देत.
कदाचित तुम्हाला ’व्हीक्टरी स्टोरी’ नावाचा क्रिकेटवरचा चित्रपट माहित नसावा. आपण 1972-73 साली इंग्लंड संघावर भारतात 2-1 असा विजय मिळवला त्यावर चक्क चित्रपट आला होता याची चित्रपटाचे असो की क्रिकेटचे किडे गुगलवर शोध घेत असतील, पण हा चित्रपट म्हणजे फिल्मी पटकथा नव्हती. टोनी लुईसच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्रिकेट संघ आपल्याकडे पाच कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता (तोपर्यंत मर्यादित षटकांचे सामने हा प्रकार नव्हता, 20-20 तर बहोत दूरची बात. त्याची साधी कल्पनाही करता येत नव्हती. शास्त्रशुद्ध क्रिकेट, जमिनीवरचे क्रिकेट म्हणजे कौतुकाची गोष्ट.) विशेष म्हणजे तोपर्यंत टोनी लुईस एकही कसोटी सामना खेळला नव्हता, पण इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट सामन्यातील त्याच्या कल्पक नेतृत्वामुळे त्याच्याकडे देशाचे नेतृत्व सोपवले होते. हा संघ आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या देशात अक्षरशः प्रचंड क्रिकेट फिव्हर होता. ते दिवसच वेगळे होते. आपणच जिंकणार असेच एकूण सामाजिक नि खेळकर वातावरण होते. याचे कारण म्हणजे 1971 साली आपण अजित वाडेकर यांच्या नवीन नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये जाऊन गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला 1-0 असे तर लगेचच काही महिन्यांनी अजित वाडेकर यांच्याच नेतृत्वाखाली रे इलिंगवर्थच्या खडूस इंग्लड संघाला इंग्लंडमध्ये जाऊन 1-0 असे पराभूत केले होते. सगळं कसं अभूतपूर्व होते. सगळीकडे क्रिकेट फिव्हर वाढला होता. मला आजही आठवतेय ते माझे शालेय जीवनातील दिवस होते आणि श्री गणेश चतुदर्शीच्या दिवशी ओव्हलवर आपण इंग्लंड संघाला एकेक धक्के देत पराभूत केले होते. रस्तोरस्ती हार घातलेले धावफलक लागले होते. गुगली गोलंदाज भागवत चंद्रशेखरने इंग्लिश फलंदाजांना हैराण केले होते आणि एकनाथ सोलकरने फॉरवर्ड शॉटलेगला उभे राहून सूर मारत झेल पकडले होते. वृत्तपत्रातील त्या क्षणाचा फोटो मीदेखील कापून ठेवला होता. त्यालाच ’पेपर कटींग ’ म्हणतात हे हेच हे कालांतराने समजले.
या विजयी संघाची तेव्हा मुंबईत विमानतळ ते ब्रेबॉर्न स्टेडियम अशी उघड्या जीपमधून फेरी मारली होती. अशा एकेक सकारात्मक गोष्टीनी देशभरात क्रिकेटप्रेमाची प्रचंड उसळलेली लाट नेमकी कधी फुटली माहित्येय? टोनी लुईसच्या संघाने नवी दिल्लीतील पहिला कसोटी सामना जिंकला आणि सगळेच हादरले. सगळीकडे आपल्या संघाविरुद्ध वातावरण निर्माण झाले. खूप संवेदनशील गोष्ट झाली होती. हा पराभव अनपेक्षित होता, पण इंग्लंडचा संघ व्यावसायिक, धोरणी नि धूर्त होता. पूर्ण आत्मविश्वासाने ते वावरू लागले, पण पुढील दोन सामने मात्र (कोलकत्ता आणि चेन्नईतील, तेव्हाचे कलकत्ता आणि मद्रास) आपल्या संघाने जिंकले आणि पुन्हा सगळीकडे क्रिकेट क्रेझ निर्माण झाली. वक्त बदल गया. रागाची जागा प्रेमाने घेतलीही. त्या काळात पाच पैशाला मिळत असलेल्या एका चॉकलेटमध्ये या दोन संघातील खेळाडूंची छोट्या आकाराची छायाचित्रे मिळत. तर एका सिगारेट कंपनीने दोन रिकामी पाकिटे पाठवा आणि आवडत्या क्रिकेटपटूंचे फोटो पोस्टाने मिळवा अशी काढलेली टूम यशस्वी ठरली. मीदेखील सुनील गावसकर व गुंडाप्पा विश्वनाथ यांचे फोटो मिळवले. पोस्टाने आलेले हे फोटो आमच्या गिरगावातील खोताची वाडीत जो जो भेटेल त्याला दाखवले. केवढा आनंद होता हो त्यात. 2-1 अशा स्थितीतील या रंगतदार मालिकेत आता उर्वरित दोन सामन्यात काय होतेय याकडे सगळ्यांचे लक्ष होते. कानपूरचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि मग मुंबईतील पाचवा कसोटी सामनाही अनिर्णित राहिला तरी तो दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहिला. एक म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. तेव्हा मुंबई पोलिसांचा निळा ड्रेस असे. मैदानात सीमारेषेबाहेरही खूप पोलीस होते. अशातच इंग्लंडचा क्रिकेटर पॅट पोकॉकने एका पोलिसाची टोपी घालून हाती दंडूका घेतला याचा फोटो वृत्तपत्रात पहिल्या पानावर आला आणि गाजला. तोही कापून वहित चिकटवून ठेवला. त्या काळात दर मध्यमवर्गीय कुटुंबातील चौथ्या घरातील मुलाकडे अशी ’वृत्तपत्रातील कटींग चिकटवण्याची वही हमखास असे’. दुसरी आठवण म्हणजे 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबईत दूरदर्शन हे नवीन माध्यम सुरू झाले आणि लगेचच 1973च्या जानेवारीत मुंबईत असलेल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. आपण घरबसल्या दूरचित्रवाणीवर पाहिलेला हा पहिला कसोटी क्रिकेट सामना आहे. याचीही पन्नास वर्ष झालीदेखील. यातील तांत्रिक प्रगती अफलातून. सुरुवातीच्या अनेक वर्षांत एकाच अ‍ॅन्गलने क्रिकेट दाखवले जाई यापासून आज स्टम्प्समध्ये माईक मैदानावरील बोलणं आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत अनेक बदल होत गेले. कधी काळी वेस्ट इंडिजमधील क्रिकेट सामन्याचे समालोचन ऐकण्यास अडथळे येत. आता घरबसल्या जगभरातील सगळ्याच क्रिकेट मैदानावरचं क्रिकेट पाह्यला मिळतेय. पूर्वी क्शन रिप्लेची कल्पनाच केली जात नसे. आता मैदानावरच्या पंचाकडे एखाद्या निर्णयावर तिसर्‍या पंचाकडे दाद जबरदस्त प्रेरणादायी अशी रियल स्टोरी यात आहे. क्रिकेट प्रक्षेपणाची पन्नास वर्षे बहुस्तरीय प्रगतीची. देशाच्या कानाकोपर्‍यात क्रिकेट पोहचवणारी. फार पूर्वी ग्रामीण भागात एका घरात अथवा शाळेत वा ग्रामपंचायतीत असलेल्या दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामना पाह्यला गाव जमे. समूहाने दूरचित्रवाणी पाहणे हादेखील वेगळाच अनुभव. त्यात आपण क्रिकेटमध्ये जिंकलो तर लाकडाची बॅट करुन माळरानावर खेळ रंगलाच समजा.
आता यात ’व्हीक्टरी स्टोरी’ नावाचा चित्रपट तो कुठे आणि कसा आला असा तुमचा गुगली प्रश्न असेलच. त्या काळात फिल्म डिव्हिजनच्या वतीने प्रत्येक कसोटी क्रिकेट सामन्याच्या काही भागांचे चित्रीकरण होई (आणि भारतीय समाचार चित्रमध्ये ते पाह्यला मिळे) तर 1972-73 सालापर्यंत दिल्ली शहरात दूरदर्शनने जम बसवला होताच, तर फिल्म डिव्हिजनच्या शूटिंगमधील भारत विरुद्ध इंग्लंड पाचही कसोटी सामन्यांची क्षणचित्रं एकत्र करून चक्क अडीच तासांचा ’व्हीक्टरी स्टोरी’ नावाचा चित्रपट पडद्यावर आलादेखील. फिल्म डिव्हिजनचीच ही निर्मिती होती. क्रिकेट समालोचक राजू भारतन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली. नुसतेच हा आऊट झाला, मग त्याने चौकार मारला अशाने रंगत कशी येईल? ते म्हणजे क्षणचित्र दाखवल्यासारखे. नाव ठेवावे लागेल,’ हायलाईट्स’. त्यापेक्षा स्क्रिप्ट लिहून रंगत आणणे उत्तमच. चित्रपट माध्यमातील ती गरज. पटकथा व संकलन माध्यमात महत्त्वाचे. विजय राघव राव यांचे याला संगीत आहे आणि विष्णू एंटरप्रायझेसच्या वतीने हा चित्रपट रिलीज झाला, तोदेखील चक्क नाझ थिएटरमध्ये आणि त्याला क्रिकेटवेड्या चित्रपट रसिकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. एकदा मिळालेला विजय सगळीकडे विजयच असतो.
आज जबरदस्त तांत्रिक प्रगती झाली असून ऑनलाईन संकलन करीत यू ट्यूब चॅनलसाठी कसोटी, वन डे आणि ट्वेंन्टी ट्न्वेन्टी सामन्यांची ’व्हीक्टरी स्टोरी’ क्रियेट करता येईल. एखाद्या मालिकेतील दारुण पराभवानंतरही आणि नवीन खेळाडूंना विश्वासात घेत बाजी पलटावता येते असा एक जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन देता येईल. वर्षभरात आपला क्रिकेट संघ सतत कुठे ना कुठे खेळत असतोच. तेवढं व्यापक कव्हरेज मिळतेय.
क्रिकेटदेखील आपल्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या गोष्टींना काही सपोर्ट सिस्टीमचे ऑक्सिजन देत असते, त्या दृष्टीनेही पाह्यची गरज आहे.
’व्हीक्टरी स्टोरी’नंतर त्याच पठडीतील चित्रपट होता ’स्पीन वर्सेस स्पेस’ (1975). आपल्या देशात क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली 1974/75 या काळात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आला असता मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखाली आपण ती मालिका 2-3 अशी चक्क हरलो, पण या मालिकेत टर्न अ‍ॅण्ड ट्वीस्ट भारी होते. चढउतार होते. रंगत होती. पहिल्या दोन सामन्यात आपला पराभव झाला आणि मग आपण यशस्वी कमबॅक करीत पुढचे दोन सामने जिंकले. आता वानखेडे स्टेडियमवर (तेथील हा पहिला कसोटी क्रिकेट सामना) सहा दिवसांची कसोटी होती. एक दिवस सुट्टीचा. आठवड्याची क्रिकेटची जत्रा. घरात, कट्ट्यावर, नाक्यावर, लोकल ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये त्या काळात क्रिकेटवर बोलावे, सांगावे, ऐकावे तेवढे थोडेच होते. या सामन्यात पराभव झाला तरी क्रिकेटमय जल्लोषावरच्या ’स्पीन वर्सेस
स्पेस’ या चित्रपटाला गर्दी होण्यास फायदा झाला. चित्रपटासाठी असेही ’मटेरियल’ उपयुक्त ठरले म्हणायचे. चित्रपटाच्या पडद्यावरचे क्रिकेट केव्हाच आवडीने पाहिले गेलेले. 1974च्या मध्यास आपल्या क्रिकेट संघाला अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली माईक डेनिसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाकडून इंग्लंडमध्ये 3-0 असा पराभव पत्करावा लागला त्यात एकदा आपला सगळा संघ 42 धावांत बाद झाला. हा पराभव फारच गाजला. एक प्रकारची जखमच ती. कधी जिंकणे, कधी हरणे हा तर खेळाचाच भाग. त्याकडे खिलाडूवृत्तीनेच पाह्यला हवे.
मल्टिप्लेक्सचा पडदा फक्त पिक्चरचं दाखवतो असं नव्हे तर क्रिकेट, फुटबॉल यांच्या सामन्यांचाही लाईव्ह अनुभव देतोय. कधी तो एखाद्या चित्रपटापेक्षा भारीही असतो. चौकार, षटकारांची जबरदस्त आतषबाजी असते. थरारक झेल असतात. अफलातून फॉलो थ्रू असतो. आणि प्रत्येक क्षणाचा अ‍ॅक्शन रिप्ले. तर मग ’पैसा वसूल मनोरंजनाला हवं तरी काय? पिक्चर आणि क्रिकेट आपल्या देशातील दूरदूरपर्यंच्या जनसामान्यांपर्यंत पोहचलेल्या आणि अतिशय आवडणार्‍या जिव्हाळ्याच्या गोष्टी. आपली सुख, दु:ख, तणाव विसरून टाकण्याची जणू हमी. त्यांची ’रुपेरी पडद्यावर केमिस्ट्री’ जमली तर हवीच आहे… आणि त्यात विश्वचषक क्रिकेट अंतिम सामन्यात भारतीय संघ फेवरेट असेल तर मल्टिप्लेक्समधील शोदेखील हाऊसफुल्ल!

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply