Breaking News

श्वास मोकळा झाला

उत्तर काशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये कोंडल्या गेलेल्या 41 कष्टकर्‍यांचे श्वास अखेर मंगळवारी मोकळे झाले. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाचाच श्वास कोंडला होता. गेले 17 दिवस या कष्टकरी मजुरांनी मृत्यूशी झुंज दिली. बचावपथकाकडून अहोरात्र सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना मंगळवारी रात्री यश मिळाले. बचावपथकांचे प्रयत्न आणि देशभरातील आबालवृद्धांकडून केली जाणारी प्रार्थना फलद्रुप झाली. या 41 मजुरांच्या सुखरूप सुटकेनंतर देशभरामध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली.

उत्तर काशीच्या डोंगराळ भागातील ही दुर्घटना, परंतु तेथील मजुरांच्या सुटकेनंतर फटाके वाजले ते शेकडो मैल दूर असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात. सार्‍यांचेच डोळे या 41 मजुरांच्या सुटकेकडे लागले होते हेच यावरून कळून येते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी मंगळवारी रात्री अडीच फूट रूंदीच्या पाईपच्या साह्याने मजुरांना सुखरूप बाहेर काढले. या मजुरांना सुरक्षित पाहण्यासाठी आणि बचावमोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग बोगद्यामध्ये उपस्थित होते. सिलक्यार्‍या येथील बोगद्यामध्ये 12 नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी मागील 17 दिवस हरप्रकारे प्रयत्न केले जात होते. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रे मागवण्यात आली होती. ‘ऑगर’सारखे यंत्रदेखील बोगद्याच्या खोदकामात पूर्णत: अपयशी ठरले. अखेर ‘रॅट माइनिंग’पद्धतीचा अवलंब करण्यात आला. ही पद्धत पारंपरिकच आहे व कोळसा खोदून काढण्यासाठी ती वापरली जाते. विशेषत: मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये रॅट होल माइनिंग पद्धतीचाच सर्रास वापर होतो. वास्तविक ही पद्धत अतिशय धोकादायक आणि अशास्त्रीय असल्याच्या कारणावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने त्यावर बंदी घातली आहे. तरीही पूर्णत: हातांनी खोदकाम करण्याच्या या जुनाट पद्धतीचा वापर करून मजुरांची सुटका करावी लागली. कारण सारी आधुनिक यंत्रे आणि तंत्रपद्धती फोल ठरल्या होत्या. अखेर हाताने खोदकाम करण्याच्या कामात तज्ज्ञ मानल्या जाणार्‍या खाणकामगारांच्या एका पथकाला मुक्रर करण्यात आले. त्यांनी रात्रीचा दिवस करून अडकलेल्या मजुरांपर्यंत अरूंद मार्ग खणून काढला. एनडीआरएफच्या जवानांनी या छोट्याशा मार्गात पाइप घुसवून मजुरांच्या सुटकेचा मार्ग तयार केला. सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांची इस्पितळात रवानगी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. बोगद्यात अडकलेल्या दुर्दैवी मजुरांना प्रत्येकी 1 लाख रूपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री धामी यांनी दुर्घटना स्थळीच केली. या संपूर्ण मोहिमेवर पंतप्रधान कार्यालयाचे बारीक लक्ष होते. किंबहुना या संपूर्ण मोहिमेची सूत्रे तेथूनच हलत होती असे कळते. मजुरांच्या सुटकेचा आनंद देशवासियांना झाला असला तरी विरोधीपक्षाच्या नेत्यांना मात्र त्याचे सोयरसुतक नाही. कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांना या यशस्वी मोहिमेचे श्रेय मिळू नये म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले. चंद्रावर यान पाठवता येते, परंतु बोगद्यातील मजुरांपर्यंत पोहचता येत नाही. हाच का तुमचा विकास, असा सवाल मोदीविरोधक करत होते. त्यांना कुठलीही उत्तरे न देता मोदी सरकार आणि बचावयंत्रणांनी मजुरांच्या सुटकेसाठी आपली पराकाष्ठा चालू ठेवली. सांघिक कार्यामुळेच हे यश प्राप्त झाले असून यामध्ये सहभागी असलेले सर्वच सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. भारतीय बचावपथकांचे जगभर कौतुक होत आहे ही बाबदेखील आनंदाचीच आहे.

 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply