Breaking News

सत्ता कुणाची?

विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल हिंदुत्व आणि कल्याणकारी योजनांच्या अवतीभवती प्रचार झाला. लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जाणार्‍या या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची गणिते आकार घेतील असे दिसते.

तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. तेलंगणासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये गेले दीड-दोन महिने विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. मिझोरममधील 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर, मध्य प्रदेशातील 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर, राजस्थानमधील 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर, छत्तीसगडमधील 90 जागांसाठी 7 आणि 17 नोव्हेंबर आणि तेलंगणातील 119 जागांसाठी गुरुवारी 30 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. या पाचही राज्यांमध्ये येत्या 3 तारखेला म्हणजे रविवारी मतमोजणी होणार आहे. त्याआधी गुरूवारी सायंकाळी एक्झिट पोलचे अंदाजही येतील, परंतु कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थानापन्न होईल याचा खरा फैसला 3 डिसेंबरलाच होईल. या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध काँग्रेस असे चित्र दिसले तर तेलंगणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसली. मिझोरममध्ये भाजप-एमएनएफ आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे दिसले. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप आणि काँग्रेस यांच्यातील उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाल्याचा वा या निवडणुका म्हणजे ‘लोकसभा निवडणुकांचा ट्रेलर’ असल्याचा सूर या काळात अनेक राजकीय पंडितांनी लावला. अलीकडेच देशातील विरोधीपक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. या आघाडीच्या स्थापनेनंतर होणार्‍या या निवडणुका असल्यामुळे त्याबद्दलही चर्चा होती, परंतु नंतर प्रत्यक्षात या पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे अस्तित्व जाणवलेच नाही. काँग्रेस हा या आघाडीतील प्रमुख पक्ष असून आम आदमी पक्ष तसेच देशभरातील अनेक राज्यांतील जवळपास 28 पक्षांचा यामध्ये समावेश आहे. या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभराचे लक्ष असले तरी, एव्हाना बहुतेक सर्व राज्यांमध्ये एप्रिल-मे महिन्यात होऊ शकणार्‍या लोकसभा निवडणुकांचे वेधच सगळ्यांना अधिक लागले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या पाचपैकी तीन राज्यांमध्ये म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झालेली दिसली. तेलंगणामध्ये मात्र चित्र निराळे होते. तेलंगणा या स्वतंत्र राज्यासाठीचे आंदोलनच मुळात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली झालेले असल्यामुळे तेथे त्यांची लोकप्रियता अफाट असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच 2014 साली तेलंगणा राज्य निर्माण झाल्यापासून तेथे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचीच सत्ता आहे. आता इतका दीर्घ काळ सत्तास्थानी राहिल्यानंतर तरी त्यांच्याविरोधात प्रस्थापितविरोधी लाट आहे का याबद्दलच काय ते तेथील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुतुहल आहे. केसीआर यांच्या राजवटीविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप या निवडणूक प्रक्रियेदरम्यान झाले. त्याचा कितपत फटका त्यांच्या लोकप्रियतेला बसला हे निकाल आल्यावर दिसेलच. एकंदर, या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभेच्या प्रचाराची दिशा ठरेल एवढे मात्र निश्चित.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply