Breaking News

चॉकलेट्समध्ये आढळल्या आळ्या

साजगाव ग्रामपंचायतीची दुकानावर कारवाईची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त वाटप केलेल्या मिठाईमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून, जेथून ही मिठाई खरेदी करण्यात आली, त्या खारघर येथील ड्रायफ्रुट्सच्या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी साजगांव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळीत फराळ आणि मिठाईला मोठी मागणी असते. दिवाळीच्या शुभेच्छा देताना ड्रायफ्रुट, मिठाई आणि चॉकलेट दिले जातात. साजगाव ग्रामपंचायतीने  खारघर येथील ड्रायफ्रुट्सच्या दुकानातून 84 हजार रुपयांचे मिठाईचे 99 बॉक्स आणले होते. या बॉक्समधील चॉकलेटमध्ये आळ्या सापडल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य विराज देशमुख, भारती शिंदे आणि ललिता पाटील यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करीत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर यांनी सरपंच, उपसरपंच आणि अन्य सदस्यांनी ही मिठाई आणल्याचे सांगत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपसरपंच विनोद गायकवाड आणि सदस्य अजित देशमुख यांनी आपल्याला या प्रकरणाची माहिती मिळताच चॉकलेट असलेले सर्व बॉक्स परत मागवल्याचे सांगितले. संबंधित दुकानदाराशी संपर्क करून त्याला या घटनेची माहिती दिल्याचेही गायकवाड आणि देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या दुकानदारावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही या दोघांनी दिली आहे. ड्रायफ्रुटच्या व्यवस्थापकाने आपल्या दुकानातून गेलेल्या चॉकलेटमध्ये आळ्या असल्याचे सुरुवातीला नाकारले होते. नंतर मात्र त्याने चूक झाल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे 84 हजार रुपयांची खरेदी केल्यानंतरही दुकानदाराने कोणतेही बिल दिलेले नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या आणि जीएसटी बुडवून सरकारचे नुकसान करणार्‍या खारघरमधील ड्रायफ्रूटच्या या दुकानावर कारवाई करण्याची मागणी साजगाव परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply