Breaking News

राज्यात अघोषित आणीबाणी : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली असे वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोलले की तुरुंगात टाकले जाते आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाते आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना रणोत यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे असे प्रकार सुरू आहेत, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सत्तेच्या अहंकारातून सरकार कशा प्रकारे वागते ते आताचे महाराष्ट्रातील सरकार दाखवून देत आहे. असे अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नाही असे सांगून या अहंकाराला आम्ही योग्य ते उत्तर देऊ. कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहेत. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे आदी नेते उपस्थित होते.
‘…म्हणून सरकारी चहापानावर बहिष्कार’
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. हिवाळी अधिवेशन दोनच दिवस घेतल्यामुळे सरकारी चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारला नुकतेच वर्ष पूर्ण झाले, मात्र हे सरकार अपयशी ठरल्याचे सांगत अधिवेशन दोनच दिवस आयोजित केल्याने विरोधक नाराज झाले असून, त्यांनी सरकारी चहापानावर बहिष्कार घालून आपली नाराजी दर्शविली.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply