कर्जत म्हटले की तेथील बहुसंख्य भागात असलेला आदिवासी समाज आठवतो. शब्द खाली पडू न देणार्या या समाजामुळे राजकीय पक्षांनी अनेक दशके आपले वर्चस्व तालुक्यावर निर्माण केले, मात्र हा समाज आता शिकला, सवरला आहे. त्यामुळे तो समाज आता आपले काय चांगले ते ओळखू लागला आहे. या समाजावर असलेला काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीचा वेढा बाजूला होत आहे. भाजपने आदिवासी समाजासाठी निर्माण केलेल्या व्यासपीठामुळे तालुक्यातील आदिवासी समाजाची ताकद आपल्याजवळ आणण्यात पक्ष यशस्वी ठरताना दिसतो. तालुक्याच्या सर्व भागात भाजपचा शिरकाव झाल्याने अनेक वर्षांपासूनची ध्येयपूर्ती समीप आल्याचे चित्र दिसून येते.कर्जत शहरात असलेले भाजपचे केडर आणि नेरळ गावातील ठरावीक कार्यकर्ते यांच्यापुरता मार्यदित असलेला पक्ष मागील 10 वर्षांत आपले बाहू सरसावू पाहत आहे. त्यात भिवपुरी आणि वेणगाव ग्रामपंचायतीमधील काही गावांत पूर्वीपासून भाजप विचाराचे कार्यकर्ते असल्याने ग्रामीण भागात तीच गावे भाजपची ओळख होती. कर्जत शहरात अन्य पक्षांची मदत घेऊन नगरपालिकेत मिळविलेले सदस्यपद असेल किंवा नेरळमधील पंचायत समिती गणाची जागा असेल तीदेखील अन्य राजकीय पक्षांच्या मदतीने निवडून आणणारी भाजप अशी सीमित शक्ती 2010पर्यंत होती. 2014ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविल्यानंतर भाजपने आपले ग्रामीण भागात कार्यकर्ते निर्माण करण्यास नियोजनबद्ध सुरुवात केली. त्या प्रवाहात अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊ लागले आणि गावोगाव भाजप दिसू लागला. सुरुवातीला स्थानिक पातळीवर जमेल तशी युती करणारा भाजप 2016च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपली शक्ती सर्वांना दाखवून आपणदेखील तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहोत याची जाणीव करून देणारा ठरला. भाजपचे संघटनात्मक असलेल्या सर्व सेलसाठी कार्यकर्ते मिळत नसलेल्या पक्षाकडे आज कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाची अंमलबजावणी तालुक्यात करून घेण्यासाठी माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या जोडीला जुनी आणि नवी मंडळी यांचे मोठे योगदान दिसून येत आहे. भाजपच्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेतले असल्याने जुना-नवीन भेदभाव दिसून येत नाही. त्यामुळे एकसंध पक्ष कर्जत तालुक्यात आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
कर्जतसारख्या काहीशा शहरीकरणापासून दूर असलेल्या तालुक्यात भाजप वाढेल असे पूर्वी कधी वाटत नव्हते, मात्र 2014ची विधानसभा निवडणुक खर्या अर्थाने पक्षवाढीसाठी टर्निंग पॉइंट ठरली आणि पक्षाने सुरू केलेल्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा राबता वाढत गेला. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आपल्या भागातील कामे घेऊन येऊ लागली व ती पक्षाच्या शिस्तीप्रमाणे जिल्हा अध्यक्ष यांच्यापर्यंत जाऊ लागली. लोकांची कामे होऊ लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांना व नागरिकांनाही पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला. त्यातून नवीन कार्यकर्ते जोडले जाऊ लागले. आज कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण केडर उभे राहू शकले आहे. मागील दीड-दोन वर्षे भाजपमध्ये कार्यकर्ते प्रवेश करण्याचे सोहळे दर 15 दिवसांनी होऊ लागले आहेत. कर्जत तालुक्यात पोशीर आणि पाषाणे येथे झालेले प्रवेश सोहळे हे अन्य राजकीय पक्षांनी बोध घ्यावे असे ठरले आहेत. तालुक्याच्या प्रत्येक भागात भाजप प्रवेश करण्याचे कार्यक्रम सुरू असतात. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते हे आपले काम होत नाही, पक्ष आपल्याला सामावून घेत नाहीत असे म्हणून नाराज होऊन कोणीही पक्ष सोडून गेला नाही.
आज कर्जत तालुका भाजपची कार्यकारिणी आहे. त्यात ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तालुक्यातील भाजपच्या प्रमुख सेलचे पदाधिकारी तेथे काम पाहत आहेत. त्या 18 कार्यकारिणी सदस्यांसह पक्षाचे केंद्र स्तरावर जे 22 सेल आहेत त्या सर्व सेलचे कर्जत तालुक्यात कामकाज सुरू असून, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना वाढीला दिले गेलेले महत्त्व यामुळे त्यांच्या निवडणूक वॉर रूममधून केले जाणारे नियोजन आणि दिल्या जाणार्या सूचना यांची अंमलबजावणी करण्यातदेखील कर्जत तालुका भाजप कार्यकर्ते मागे नाहीत. त्याचवेळी पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून दररोज बूथप्रमुख आणि शहर अध्यक्ष यांना दररोज मेसेजेस पाठवले जात असून, त्याचा प्रत्यक्ष फायदा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे.
भाजपने जोर लावला म्हणून मावळ लोकसभा निवडणुकीचा निकाल भक्कम लागला हे राजकीय विश्लेषक मान्य करतात. त्यामुळे भाजपचे कर्जत मंडळ अगदी योग्य काम करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते. कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांत निर्माण केली असून, त्यामुळेच भाजप आपली ताकद बनवून उभा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेकडे मागील वर्षभरात जाणीवपूर्वक लक्ष दिले असल्याचे दिसून येते.
कारण कर्जत तालुक्यात निवडणुकीत मतदान घेतले जात असलेल्या सर्व 206 बूथमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्याआधी बूथप्रमुखाकडून कामे करून घेण्यासाठी शक्तीकेंद्र प्रमुख निवडले आहेत. पक्षाची वाढती रचना लक्षात घेऊन पूर्वी शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याकडे 10 मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असायची. ती आता कमी करून जास्त शक्तीकेंद्र प्रमुख यांची निवड करून त्या सर्वांकडून अधिक सक्षमपणे पक्षाची कामे करून घेण्यावर भर दिला जात आहे. आता नव्या रचनेत जास्त जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना शक्तीकेंद्र प्रमुख करण्यात आले असून, आजघडीला कर्जत तालुका भाजपकडे 58 शक्तीकेंद्र प्रमुख आहेत. त्यामुळे आपोआप मतदान केंद्राची जबाबदारी विभागली गेली आहे. हे 58 शक्तीकेंद्र प्रमुख पुढे जाऊन बूथ प्रमुखांकडून अधिकचे मतदान काढून घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजप शहरी भागात ज्याप्रमाणे पक्ष निवडणुकीत काम करतो, त्याप्रमाणे ग्रामीण भागावर लक्ष टाकले आहे. आता कर्जत तालुक्यातील 206 बूथप्रमुखांना पन्नाप्रमुखांचे बळ मिळणार आहे. हे पन्नाप्रमुख आपल्या मतदान केंद्रातील मतदार वाटून घेणार असून, त्यांच्याकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पडणार आहे. त्यामुळे मतदार बाहेर पडून मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकतो. हे काम निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पक्षाला अधिक बळकटी देणारे ठरू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कर्जत तालुक्यातील वाटचाल ही ध्येयाकडे आणि ध्येयपूर्तीकडे असल्याचे स्पष्ट होते.
-संतोष पेरणे, कर्जत