Breaking News

नमो खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद; खुल्या गटात मृणाल सरोदे, अर्चना जाधव विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि.14) झालेल्या नमो खारघर मॅरेथॉन 2024मध्ये तब्बल 19 हजार 601 स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही स्पर्धा उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक करणारी ही मॅरेथॉन ठरली. या स्पर्धेतील पुरुष खुल्या गटात मृणाल सरोदे, तर महिला खुल्या गटात अर्चना जाधवने प्रथम क्रमांक पटकावित विजेतेपदाचा किताब जिंकला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड या वेळी मोडले. खारघर सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या मॅरेथॉनला स्पर्धेचे मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय.टी. देशमुख, सेलिब्रिटी जया जुगल परमार, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेचे शिखर गाठली. यंदाचा सहभाग सर्वांत जास्त असल्याने आयोजकांकडून या सर्वांचे आभार मानण्यात आले. यंदाची ही स्पर्धा 14वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट 10 किलोमीटर अंतर, महिला खुला गट 10 किलोमीटर अंतर, 17 वर्षाखालील मुले गट पाच किमी अंतर, 17 वर्षाखालील मुली गट पाच किलोमीटर, 14 वर्षाखालील मुले गट पाच किमी अंतर, 14 वर्षाखालील मुली गट पाच किमी अंतर तसेच खारघर दौड गट तीन किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड दोन किलोमीटर अशा गटांत मॅरेथॉन झाली. विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरूपात तसेच मेडल सर्टिफिकेट आदी बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन, स्वागत, प्रसिद्धी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत होत्या. या वेळी सर्व स्पर्धकांसाठी बिस्किटे, पाणी, ओआरएस एनर्जी ड्रिंक आयोजकांकडून मोफत देण्यात आले होते. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध प्री-इव्हेंट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या झुम्बा डान्सचा स्पर्धक आणि क्रीडारसिकांनी मनमुराद आनंद लुटला. या मॅरेथॉनमध्ये विविध सामाजिक हिताचे संदेश देणार्‍या शाळा, सोसायटी, संस्थांचा सहभाग लक्षवेधी होता.
नियोजनबद्ध व शिस्तप्रिय अशा या मॅरेथॉनची उत्सुकता वर्षभर लागून राहिलेली असते. दिवाळी संपल्यावर या मॅरेथॉनचे वेध स्पर्धक आणि क्रीडारसिकांना लागलेले असतात. त्यामुळे ही मॅरेथॉन एक पर्वणी असते. राज्यातील नामवंत अशा या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभत असतो. यंदाही लहानग्यांपासून युवा, ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग होता. त्यामध्ये 93 वर्षाचे विजय श्रीरंग यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ.अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, संजय भगत, समीर कदम, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चाचे अध्यक्ष पनवेल शहर सुमित झुंझारराव, अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, दीपक शिंदे, रमेश खडकर, विनोद घरत, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, अजय माळी, किरण पाटील, विपुल चौटालिया, सचिन वास्कर, अ‍ॅड. इर्शाद शेख, संतोषकुमार शर्मा, चंद्रकांत घरत, प्रभाकर जोशी, विनोद घरत यांच्यासह विविध संस्था, संघटना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाचे कार्यकुशल व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय भरारी घेतली आहे. त्यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे आपला देश झपाट्याने प्रगती करीत आहे. एवढेच नाही तर जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आज आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य माणसाला काय हवे आहे याची जाणीव पंतप्रधान मोदींना आहे. म्हणूनच त्यांचे लोकपोयोगी निर्णय देशाच्या उत्कर्षांसाठी हिताचे ठरले आहेत. देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या अंतर्गत झालेल्या या नमो खारघर मॅरेथॉनला स्पर्धक आणि क्रीडारसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचे मी आभार मानतो.
-प्रशांत ठाकूर, आमदार

मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. आयोजनात कसूर राहू नये यासाठी वेळोवेळी त्या अनुषंगाने आढावा घ्यावा लागतो. 2006 साली सुरू झालेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे नियोजनबद्ध आखणीचा सराव झाला आहे. त्यातच दरवर्षी या मॅरॅथॉनला वाढता प्रतिसाद मिळत आहे आणि यंदाही तशी नोंद झाली आहे. त्यामुळे आम्हाला आयोजनात स्फूर्ती लाभत असते.
-स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, चेअरमन, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

सविस्तर निकाल

  • पुरुष खुला गट अंतर 10 किलोमीटर ः प्रथम क्रमांक मृणाल सरोदे (25 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), द्वितीय क्रमांक संदीप पाल (15 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), तृतीय क्रमांक निवास मोटे (10 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये.
  • महिला खुला गट अंतर 10 किलोमीटर ः प्रथम क्रमांक अर्चना जाधव (25 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), द्वितीय क्रमांक ऋतुजा सकपाळ (15 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), तृतीय क्रमांक कोमल खांडेकर (10 हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल), उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी 01 हजार रुपये.
  • 17 वर्षाखालील मुले गट अंतर पाच किलोमीटर ः प्रथम क्रमांक राज भगत (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक कुशल कपिलेश्वरी (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक दर्शन यादव (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ 10 स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये.
  • 17 वर्षाखालील मुली गट अंतर पाच किलोमीटर ः प्रथम क्रमांक मयुरी चव्हाण (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक आस्था लाड (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक श्रावणी केणी (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ 10 स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये.
  • 14 वर्षाखालील मुले गट अंतर पाच किलोमीटर ः प्रथम क्रमांक ओमकार पाटील (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक जय जाधव (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक साहिल ठोंबरे (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ 10 स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये.
  • 14 वर्षाखालील मुली गट अंतर पाच किलोमीटर ः प्रथम क्रमांक पूजा चव्हाण (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक श्रेया पाटील (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक वैष्णवी पाटील (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ 10 स्पर्धकांना प्रत्येकी 01 हजार रुपये.
  • खारघर दौड (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटांत) अंतर तीन किलोमीटर ः स्पर्धा पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ज्येष्ठ नागरिक दौड (पुरुष गट) अंतर दोन किलोमीटर ः प्रथम क्रमांक अनिल खंडेलवाल (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक बाळकृष्ण कांबळे (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक सीताराम उतेकर (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ज्येष्ठ नागरिक दौड (महिला गट) अंतर दोन किलोमीटर ः प्रथम क्रमांक अल्फीया अदिब (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक लीलामोरा फ्रान्सिस (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक शोभा पोखरकर (दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र), उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply