Breaking News

सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा महायुतीचा निर्धार

अलिबाग येथे मेळावा उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील सर्व पक्षांनी एकदिलाने काम करण्याचा तसेच केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार रविवारी (दि. 14) झालेल्या महायुतीच्या रायगड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला.
महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अलिबाग समुद्रकिनार्‍याजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी कार्यकर्त्यांचे मनोमिनल होणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठीच हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मागे काय झाले हे विसरा आणि देशाच्या भविष्याचा विचार करून समन्वय ठेवून एकत्रितपणे काम करा, असा सल्ला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे आमदार रविशेठ पाटील, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, भाजप नेते बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रम पाटील, सतीश धारप, अविनाश कोळी, वैकुंठ पाटील, दिलीप भोईर, अ‍ॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास राज्याची प्रगती होते. राज्याच्या विकासाचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहे. विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून सर्व निवडणुका लढविण्याची गरज आहे, असे खासदार सुनील तटकरे या वेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात देशाचे नाव उंचावले आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होत आहे. विरोधकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता नाही. देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
रायगड जिल्ह्यात महायुतीचा गड भक्कम करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ही सुरुवात आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास भविष्यात जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
नुकताच देशातील सर्वांत मोठा अटल सागरी सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. रायगड जिल्हा थेट मुंबईशी जोडला गेला आहे. त्यामुळे उरण, पनवेल, पेण या तालुक्यांचा विकास होणार आहे. रेवस-करंजा पूल होणार आहे. लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होईल. त्यामुळे रायगडचे चित्र बदलणार आहे. केंद्र व राज्य सरकार जी विकासकामे करीत आहे ती लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. ती व्यवस्थितपणे पार पाडा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले.
आजच्या या मेळाव्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असेल. आपण सर्वांनी एका विचाराने पुढे जायची गरज आहे. एका विचाराने, एका ध्येयाने पुढे जाऊ तेव्हा रायगडातील जनता आपल्या पाठीशी येईल, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
देशाचा विकास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. 45 प्लस नाही, तर महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार महायुतीचे निवडून येतील, असा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला.
महायुतीमधील सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कामाला लागावे. फक्त लोकसभा आणि विधानसभेच्याच निवडणुका नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येदेखील एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे आमदार भरत गोगावले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतःची 15 टक्के मते आहेत. त्या मतांशी सर्वांनी जोडून घेतल्यास निवडणूक अवघड नाही. पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागणार आहे. कुणालाही कमी न लेखता सर्व ताकदीनिशी आपण निवडणुकांना सामोरे जाऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवूया, असे आवाहन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील तीन राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळे इतर पक्षांची ताकदच उरलेली नाही. त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरज नाही. जिल्ह्यात राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी आपण सर्वांनी मागील गोष्टी विसरून एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उमा मुंढे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले.
महायुतीमधील सर्व पक्षांना एकत्र घेऊन हा मेळावा आयाजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे, असे भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रम पाटील प्रास्ताविकात म्हणाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply