दुबई ः वृत्तसंस्था
मोसमातील पहिला सामना खेळणारा जेसन रॉय (60) आणि कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद 51) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात केली. राजस्थानने दिलेले 165 धावांचे आव्हान 18.3 षटकांत पूर्ण करीत हैदराबादने मोसमातील केवळ दुसर्या विजयाची नोंद केली. ते बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाले आहेत, पण राजस्थानला आगेकूच करणे या पराभवामुळे अवघड होऊ शकेल. हैदराबादचे सलामीवीर रॉय आणि वृद्धिमान साहा (18) यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकांत 57 धावांची सलामी दिल्यावर साहाला महिपाल लोमरोरने बाद केले. यानंतर रॉयला कर्णधार विल्यम्सनची उत्तम साथ लाभली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचल्यावर रॉय माघारी परतला. युवा प्रियम गर्गला खातेही उघडता आले नाही, मात्र विल्यम्सन आणि डावखुर्या अभिषेक वर्मा (नाबाद 21) यांनी उर्वरित धावा करत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 167 अशी धावसंख्या उभारली होती. एव्हिन लुईस (6) लवकर माघारी परतल्यावर कर्णधार संजू सॅमसन (82) आणि मुंबईकर यशस्वी जैस्वाल (36) यांनी राजस्थानला सावरले. सॅमसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ऑरेंज कॅपही आपल्या नावे केली. अखेरच्या षटकात लोमरोरने (नाबाद 29) चांगले योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स ः 20 षटकांत 5 बाद 164 (संजू सॅमसन 82, यशस्वी जैस्वाल 36, सिद्धार्थ कौल 2/36) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद ः 18.3 षटकांत 3 बाद 167 (जेसन रॉय 60, केन विल्यम्सन नाबाद 51; महिपाल लोमरोर 1/22).
RamPrahar – The Panvel Daily Paper