अलिबाग ः प्रतिनिधी
फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आगमन झाले. सकाळपासून घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होती. दीड दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपती बाप्पांना बुधवारी (दि. 20) सायंकाळी निरोप देण्यात आला. जिल्ह्यात 10 सार्वजनिक व 25 हजार 614 अशा एकूण 25 हजार 624 इतक्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
जिल्ह्यात एक लाख दोन हजार 852 घरगुती तर 271 सार्वजनिक गणेश मूर्तीची मंगळवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी घरोघरी ढोलकी आणि टाळ यांच्या साथीने आरत्या घुमल्या. त्यानंतर बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. बाप्पांच्या सेवेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी गणेश भक्त काळजी घेत होते तर पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने वेळ साधताना भटजी मंडळींना कसरत करावी लागत होती.
4 वाजल्यानंतर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. पारंपरिक खालू बाजा आणि ढोल ताशा, डीजेच्या तालावर ठेका धरत लहान थोर मंडळी, महिला गुलाल उधळत मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपारिक लेझिम नृत्य सुरू होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सुरू होता. नदी, तलाव, समुद्र, विहिरी, ओढे याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*फोटो विसर्जन
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …