कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
जागृत कष्टकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारुन आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कर्जतच्या आमराई पुलापासून निघालेल्या या आक्रोश मोर्चात जागृत कष्टकरी संघटनेच्या कार्याध्यक्षा नॅन्सी गायकवाड, अध्यक्ष केशव वाघमारे, सचिव अनिल सोनावणे, खजिनदार वसंत पवार, कर्जत तालुका अध्यक्ष रमेश सटु आगज, सचिव सदानंद आंबो शिंगवा, खजिनदार किसन रावजी पादिर तसेच सुशिला भोई, लक्ष्मी हिलम, जाई वाघमारे, सिता पवार, शकुंतला वाघमारे, कृष्णा गारे, लता दरवडा, कान्हु दरवडा, मारुती वाघमारे, अंकुश पवार, नामदेव निरगुडा, कृष्णा वाघमारे, किसन कांबडी आदिंसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे.
कर्जत तालुक्यातील जवळपास 1300 कुटुंबाची अतिक्रमणे नियमाकुल करुन त्याच्या नोंदी सातबार्यावर घेतलेल्या असून ग्रामपंचायतीच्या असेसमेंट उतार्यावरदेखील त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. तसेच खरवंडी व वंजारवाडी येथील आदिवासी कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून या दोन्ही ठिकाणच्या पाणी योजना मंजुर झालेल्या आहेत. तात्पुरता पाणी टंचाईचा प्रश्न दोन दिवसात सोडवला जाईल, असे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी या वेळी दिले. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी सहकार्यांसह मोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली.
जागृत कष्टकरी संघटनेच्या निवेदनातील मागण्या कातकरी उत्थान अभियानांतर्गत सोडविण्याचे काम अगोदरपासूनच सुरू आहे. जे प्रलंबित विषय आहेत त्यावर तात्काळ निकाली काढण्यात येतील. -विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत