Breaking News

शिवसेना हिंदुत्ववादी राहिलेली नाही

खासदार नारायण राणेंचा घणाघात

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, असा घणाघात भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्याचप्रमाणे आमदार राम कदम यांच्या जनआक्रोश यात्रेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी बुधवारी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते, मात्र ही यात्रा निघण्याआधीच कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतले. यानंतर खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठले. त्या वेळी खासदार राणेंनी माध्यमांशी संवाद साधला.
खासदार राणे म्हणाले की, पालघरमध्ये साधूंची जी हत्या झाली, ज्या प्रकारे झाली त्यानंतर राज्य सरकारने त्या अत्याचाराबद्दल जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत त्यांच्याविरोधात योग्य कारवाई न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी आंदोलन केले. भारत हा साधू-संतांचा देश आहे. त्यांच्यावर अत्याचार नाही झाले पाहिजेत अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळेच आमदार राम कदम यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आम्ही असे समजतो की हे जे सध्या महाराष्ट्रात सरकार आहे त्यांची क्षमता नाही किंवा ते या साधूंना न्याय मिळावा या मताचे नाहीत.
आमचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे शिवसेना म्हणत असल्याचे खासदार राणेंना सांगितल्यावर त्यांनी म्हटले की, जर कुणी परीक्षेलाच बसत नसेल, तर त्याला प्रमाणपत्र कोण देईल? उद्धव ठाकरे कुठल्याही परीक्षेला बसत नाही आणि पासही होत नाही. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री होऊन वर्ष होत आले तरीदेखील त्यांनी कुठल्याही क्षेत्रासाठी काम केले नाही. काम तर काहीच करीत नाही. घरात पिंजर्‍यात बसतात व राम राम म्हणत राहतात. म्हणून तर राम कदम यांना आंदोलन करावे लागले.
उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार?
राज्य सरकार हिंदूविरोधी आहे का? असा प्रश्न खासदार राणेंना विचारण्यात आल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, ज्या दिवशी त्यांनी भाजपबरोबर गद्दारी करून ते स्वतः मुख्यमंत्री होऊन बसले. तर तुम्ही समजले पाहिजे की, हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी केली व हिंदुत्वाचा त्याग केला. मग त्यांच्याकडून साधू-संतांचे रक्षण करण्याची काय अपेक्षा करणार?

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply